एसटीचे झाले ‘टायर पंक्चर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2016 01:48 AM2016-07-28T01:48:29+5:302016-07-28T01:48:29+5:30
नवीन टायरची खरेदी विलंबाने झाल्याने एसटी महामंडळाला आणि प्रवाशांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. टायरअभावी एसटीची सेवा ‘पंक्चर’ झाली असून नवीन टायर नसल्याने
- सुशांत मोरे, मुंबई
नवीन टायरची खरेदी विलंबाने झाल्याने एसटी महामंडळाला आणि प्रवाशांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. टायरअभावी एसटीची सेवा ‘पंक्चर’ झाली असून नवीन टायर नसल्याने जून महिन्यापासून अनेक गाड्या आगारांत उभ्या करून ठेवाव्या लागल्याचे समोर आले आहे. सेवा कोलमडू नये यासाठी महामंडळाने पहिल्या टप्प्यात जवळपास दहा हजार नवीन टायर राज्यातील अनेक आगारांत त्वरित रवाना केले आहेत.
एसटीच्या राज्यात १८ हजार बस आहेत. लांब पल्ल्याच्या सेवा देतानाच मध्यम पल्ल्याच्या बसही मोठ्या प्रमाणात धावत असल्याने एसटी बससाठी दर सहा महिन्यांनंतर टायर खरेदी केले जातात. मात्र ही खरेदी करण्याचा निर्णय विलंबाने झाल्याने त्याचा मोठा फटका जून महिन्यापासून एसटीच्या बस सेवांना बसला. नवीन टायर उपलब्धच न झाल्याने राज्यातील एसटीच्या अनेक आगारांत बसगाड्या उभ्या करून ठेवण्याशिवाय पर्याय उरला नाही. ही परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. आषाढी एकादशीमध्ये तर राज्यभरातून पंढरपूरमध्ये वारकरी दाखल होतात. बसअभावी वारकऱ्यांचे मोठे हाल त्या वेळी झाले. एसटीची परिस्थिती सुधारावी यासाठी महामंडळाने त्वरित टायर खरेदी करण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यासाठी सीएट व एमआरएफकडून तब्बल ५0 हजार टायर खरेदी करण्यात आले. यात ३५ हजार रेडिएटर आणि १५ हजार नायलॉनच्या टायरचा समावेश आहे. यातील दहा हजार टायर राज्यातील अनेक आगारांत पाठवण्यात आले. मात्र बसची संख्या जास्त असल्याने परिस्थिती सुधारण्यास थोडा वेळ लागणार असल्याचे सांगितले जाते.
सात हजार बसना फटका?
- जवळपास सात हजार एसटी बसना टप्प्याटप्प्यात हा फटका बसल्याचे सांगितले जाते. राज्यातील अनेक आगारांतून बस बाहेर पडत नसल्याने जून ते जुलै महिन्यात प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.
यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांना विचारले असता, टायरअभावी सात हजार बसना फटका बसल्याची माहिती त्यांनी फेटाळली. मात्र दुसरीकडे रेडिएटर आणि नायलॉन प्रकारातील दहा हजार नवीन टायर अनेक आगारांत कधीच रवाना केल्याची माहिती त्यांनी दिली. आणखी नवीन टायर लवकरच अनेक आगारांत पाठवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.