‘यूपीआय’द्वारे एसटीची तिकीट विक्री वेगात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 05:47 AM2024-06-08T05:47:54+5:302024-06-08T05:48:03+5:30
प्रवाशांची सुट्या पैशांची चिंता मिटली, पाच महिन्यांत ३६ कोटींचे उत्पन्न
मुंबई : एसटी महामंडळाने बसवाहकांसाठी ॲण्ड्राईड तिकीट इश्यू मशिन्स खरेदी केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना रोख रकमेऐवजी यूपीआय, क्यूआर कोड या डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येत असल्याने प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्या पैशांची चिंता करण्याची आवश्यकता नाही. महत्त्वाचे म्हणजे जानेवारीपासून मेअखेरपर्यंत १४ लाख ३२ हजार तिकिटांची विक्री झाली असून, यातून ३५ कोटी ८७ लाख १५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
जानेवारीत प्रतिदिन ३ हजार ५०० तिकिटे यूपीआयद्वारे
जानेवारीमध्ये प्रतिदिन ३ हजार ५०० तिकिटे यूपीआयद्वारे काढली जात होती. यामध्ये मेपर्यंत पाचपट वाढ झाली. प्रतिदिन २० हजार ४०० तिकिटे सरासरी काढली जात आहेत. जानेवारीत हे प्रमाण प्रतिदिन १० लाख रुपये होते. मेमध्ये ४५ लाख रुपये प्रतिदिन झाले आहे.
वाहकाच्या ॲड्राईड तिकीट मशीनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. या सुविधेमुळे रोख नसलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून, सुट्या पैशांसाठी वाहकांसोबत वाद होण्याचे प्रसंग टळणार आहेत.
यूपीआय पेमेंटद्वारे प्राप्त उत्पन्न
महिना तिकीट संख्या उत्पन्न (रुपयांत)
जानेवारी १०९४९६ ३,१२,८७,२७७
फेब्रुवारी १३३१५७ ४,१०,७०,९४१
मार्च २०५९६१ ५,८६,५०,७८७
एप्रिल ३५०७३६ ८,७५,२३,९१०
मे ६३२६९० १४,०१,८२,७०७
एकूण १४३२०४० ३५,८७,१५,६२२