दिवाळीत एसटी प्रवास महाग; १० टक्के हंगामी भाडेवाढीचा निर्णय; सर्वसामान्यांवर पडणार बोजा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 06:33 AM2022-10-15T06:33:28+5:302022-10-15T06:34:25+5:30
दिवाळीच्या दहा दिवसांमध्ये १० टक्के हंगामी तत्त्वावर भाडे वाढवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्या लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ दीड हजार जादा गाड्या सोडणार असले तरी या काळात भाडेवाढीची झळ सामान्यांना सोसावी लागणार आहे.
दिवाळीच्या दहा दिवसांमध्ये १० टक्के हंगामी तत्त्वावर भाडे वाढवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एकीकडे या काळात खासगी वाहतूक अव्वाच्या-सव्वा दरात केली जात असताना आता एसटी प्रवासही खिशाला झळ देऊन जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार असून, लवकरच त्याची माहिती महामंडळाकडून प्रवाशांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. २० ऑक्टोबर मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल.
आरक्षण केलेल्या प्रवाशांना द्यावा लागेल फरक
ज्या प्रवाशांनी आरक्षण केले आहे त्यांच्याकडून वाहकाद्वारे आरक्षण तिकीट दर व नवीन दर यातील फरक घेण्यात येईल. मात्र, ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू असणार नाही.
शिवनेरी व अश्वमेध सेवेला वगळले
प्रस्तावित भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसना ही भाडेवाढ लागू राहणार नाही.
ज्येष्ठांच्या सवलती कायम
महामंडळाने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास करण्याची सवलत दिली आहे. ६५ ते ७५ वर्षांदरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"