एसटीची विनाअपघात सुरक्षितता मोहीम
By Admin | Published: January 5, 2015 04:46 AM2015-01-05T04:46:37+5:302015-01-05T04:46:37+5:30
सुरक्षित प्रवासाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे विनाअपघात सुरक्षितता मोहीम राबविली जात आहे.
ठाणे : सुरक्षित प्रवासाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे विनाअपघात सुरक्षितता मोहीम राबविली जात आहे. येत्या १० जानेवारीपर्यंत एसटीच्या ठाणे विभागीय कार्यालयातर्फे जिल्ह्यातील आठही आगारांमध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.
प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास निर्माण करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट अहे. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, सुरक्षित वाहतुकीसाठी आखून दिलेली कार्यपद्धती पाळून अपघात होणार नाही याची दक्षता घेणे, या उद्देशाने दरवर्षी ही मोहीम राबविण्यात येते. महामंडळातर्फे चालकांचे प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी अशा विविध योजना राबविल्या जातात. त्याचप्रमाणे अपघातविरहित सेवेला प्रोत्साहन मिळावे म्हणून चालकांना रोख बक्षिसे, पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि सुरक्षित सेवांचे बिल्ले देऊन सन्मानित केले जाते. चालकांसाठी अत्याधुनिक स्वयंचलित चाचणी मार्ग तयार करण्यात आला असून, त्यावर वाहनचालकांना प्रशिक्षण दिले जात आहे. शून्य अपघात मोहीम ही कायमस्वरूपी राबविण्यात येत असते. परंतु, जनजागृतीच्या कालावधीत या मोहिमेला विशेष महत्त्व देण्यात येते, असे एसटीचे ठाणे विभागीय वाहतूक अधिकारी एस.बी. चौगुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एखाद्या अपघातानंतर जीवितहानी झाल्यास त्याची किंमत पैशांत मोजता येत नाही. विनाअपघात सेवा देण्यासाठी मद्यपान करणारे तसेच बेदरकारपणे गाडी चालविणारे यांचाही गस्ती पथकांद्वारे शोध सुरू असल्याचेही एसटीच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)