एसटी होणार ‘चकाचक’
By Admin | Published: October 17, 2016 04:27 AM2016-10-17T04:27:24+5:302016-10-17T04:27:24+5:30
एसटी महामंडळाने स्वच्छतेसाठी राज्यातील सर्व स्थानकांत सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : एसटी स्थानकांमध्ये असलेली अस्वच्छता, धुळीने माखलेल्या बसेस, प्रसाधनगृहांमध्ये असलेली अस्वच्छता व दुर्गंधी, चालक-वाहकांच्या रेस्ट रूमचीही झालेली दुरवस्था पाहता, एसटी महामंडळ स्वच्छतेला गांभीर्याने घेणार का, असा सवाल उपस्थित होत होता. याची गांभीर्याने दखल घेत आणि प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार एसटी महामंडळाने स्वच्छतेसाठी राज्यातील सर्व स्थानकांत सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खासगी संस्था किंवा कंपन्यांना काम दिले जाणार असून, निविदा प्रक्रिया सुरू आहे. २0१७ च्या जानेवारीपासून सर्व स्थानकांत स्वच्छतेसाठी संस्था किंवा कंपन्यांची नेमणूक केली जाईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली.
एसटी महामंडळाकडे १७ हजार बसेस, १५0 आगार आणि ५६८ स्थानके आहेत. यातील सर्व स्थानकांत असलेल्या प्रसाधनगृहांची कामे खासगी संस्थेला, तर काही मोजक्याच स्थानकांतील स्वच्छतेची कामेही संस्था, तसेच कंपन्यांना देण्यात आली आहेत. मात्र, नेमण्यात आलेल्या संस्थांकडून स्थानके आणि प्रसधानगृहांत स्वच्छता होताना दिसत नाही, तर बसेसमधील असलेल्या अस्वच्छतेमुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते. प्रवाशांसाठी असणाऱ्या प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे महामंडळाच्या निदर्शनासही आले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ५६८ स्थानकांतील स्वच्छतेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कामासाठी ‘आउटसोर्सिंग’करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वच्छतेची कामे ही संस्था, तसेच कंपन्यांना देण्यात येतील. ही कामे देण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. २0१७ च्या जानेवारी महिन्यापासून सर्व स्थानकांत संस्था, तसेच कंपन्यांची नेमणूक केली जाईल. साधनसामुग्री ही एसटीकडून पुरविण्यात येईल, तर मनुष्यबळ हे संस्थांकडून देण्यात येईल. स्थानकांतील सफाई करतानाच, कार्यालये, बसेस, चालक-वाहकांची रेस्ट रूम, प्रसाधनगृहे इत्यादी सफाई करण्यावर भर दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. स्वच्छतेअभावी प्रवासी दुरावले जात असल्याने, त्या भीतीपोटी महामंडळाने १ मेपासून राज्यातील आगार, बस स्थानके, प्रसाधनगृहांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी १ मेपासून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. स्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेचे काम हे खासगी संस्थांकडे आहे. त्याची स्वच्छता समाधानकारक न झाल्यास, खासगी संस्थांवर कारवाई करण्याचा इशाराही एसटी महामंडळाकडून देण्यात आला होता. प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून कोणतीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी आगारप्रमुख आणि आगार व्यवस्थापकांना घेण्यास सांगितले होते. त्यानंतर मात्र, पुन्हा तीच परिस्थिती स्थानक आणि बसमध्ये दिसून आली. (प्रतिनिधी)
> ई-सेवामधून आरक्षण
इंद्रधनू आरक्षण प्रणाली अंतर्गत ग्रामिण भागातील सर्वसामान्य प्रवाशांना एसटीचे बसचे आगाऊ आरक्षण उपलब्ध व्हावे या दृष्टिने इतर शासकीय सेवांप्रमाणे महा ई-सेवा केंद्रातून एसटी तिकीटाची आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
या योजनेअंतर्गत सध्या कार्यरत असलेलया मे.महा आॅनलाईन लिमिटेड कंपनीच्या ५,८00 ई-सेवा केंद्रातून तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालयातील विविध दाखल्याप्रमाणे इच्छित प्रवासाचे तिकीट काढता येणे शक्य होईल.