एसटी आता पेट्रोल, डिझेल विक्री करणार; बस बांधणी, मालवाहतूक, टायर रिमोल्डिंगवर यापुढे राहणार भर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 02:58 AM2020-09-13T02:58:14+5:302020-09-13T02:58:38+5:30

महामंडळाची ९० टक्के यंत्रणा सध्या बसून आहे. त्यांचा पगार कसा द्यायचा, हा प्रश्न आहे.

ST will now sell petrol, diesel; The emphasis will now be on bus construction, freight, tire removal | एसटी आता पेट्रोल, डिझेल विक्री करणार; बस बांधणी, मालवाहतूक, टायर रिमोल्डिंगवर यापुढे राहणार भर

एसटी आता पेट्रोल, डिझेल विक्री करणार; बस बांधणी, मालवाहतूक, टायर रिमोल्डिंगवर यापुढे राहणार भर

googlenewsNext

- बाळासाहेब बोचरे

मुंबई : कायम तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांत साडेतीन हजार कोटींचा फटका बसला. दररोजची प्रवासीसंख्या ६५ लाखांवरून पाच लाखांवर आली. उत्पन्न २२ कोटींवरून दीड कोटीवर आले. महामंडळाची ९० टक्के यंत्रणा सध्या बसून आहे. त्यांचा पगार कसा द्यायचा, हा प्रश्न आहे. अशा काळात प्रभारी असलेले उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी अधिकृत पदभार घेतला. त्यानंतर त्यांच्याशी झालेली बातचीत.

एसटीला संकटातून बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?
कायम तोट्यात असलेल्या परिवहन महामंडळाने आता प्रवासी सेवेव्यतिरिक्त मालवाहतूक आणि पेट्रोल पंप उभारून एसटीचे उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एसटीचे व्यावसायिक तत्त्वावरील ३० पेट्रोल पंप लवकरच कार्यान्वित होतील. इंडियन आॅइल कॉर्पोरेशन एसटीच्या जागेत पेट्रोल पंप उभारणार आहे. एसटीने फक्त कमिशन बेसिसवर त्याची विक्री करायची आहे. यातून एसटीला कायमस्वरूपी चांगले उत्पन्न मिळेल. आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर व काटकसर करून उत्पन्न वाढवायचे असे धोरण आता राबवणार आहोत.

पूर्ण क्षमतेचा वापर म्हणजे नेमके काय करणार?
महामंडळाकडील १८,५०० बसपैकी सरासरी १२,००० बस धावतात. गर्दीच्या हंगामात सरासरी १५,००० बस धावतात. सध्या फक्त चार हजार बस धावत आहेत. आता त्यापैकी काही बस मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहेत, तर काही बस स्क्रॅप करण्यात येणार आहेत. यापुढे केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम बसच रस्त्यावर धावतील. मालवाहतुकीसाठी आम्ही ८८० गाड्या तयार केल्या. त्याद्वारे गेल्या तीन महिन्यांत नऊ कोटींचे उत्पन्न मिळाले. राज्यात कुठेही माल पोहोचवण्याची आमच्याकडे क्षमता आहे. यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. कार्यशाळेत प्रतिबस बांधणीसाठी ११०० तास लागतात. ते काम ७०० तासांपर्यंत कमी होणे अपेक्षित आहे. उरलेल्या वेळेत आम्ही खासगी बस बांधून देऊ शकतो. आमच्याकडील टायर रिमोल्डिंग युनिटचाही वापर व्यावसायिक तत्त्वावर सध्या करत आहोत.

स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय
५० वर्षांच्या पुढील २७ हजार कर्मचारी आहेत, त्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय ठेवला आहे. त्यापैकी वीस हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तरी दरमहा ८०-९० कोटींची बचत होऊ शकते.

एसटी कुठे कमी पडते?
आमच्यात काही त्रुटी असतील, पण एसटीएवढी स्वस्त आणि सुरक्षित सेवा कोणीच देऊ शकत नाही. काही त्रुटी दूर केल्या तर आम्ही स्पर्धकांवर निश्चितच मात करू. प्रवाशांच्या सोयीच्या वेळेनुसार गाड्या सोडणे, त्या स्वच्छ ठेवणे, स्थानके व प्रसाधनगृहे स्वच्छ असावीत या प्रवाशांच्या माफक अपेक्षा आहेत.
त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांची (विशेषत: वाहक व चौकशी खिडकीवरील वाहतूक नियंत्रक) प्रवाशांबरोबरची वागणूकही महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.

Web Title: ST will now sell petrol, diesel; The emphasis will now be on bus construction, freight, tire removal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.