समृद्धी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट! उद्यापासून नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 09:20 PM2022-12-14T21:20:10+5:302022-12-14T21:22:16+5:30

Nagpur-Shirdi bus : प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी एसटी महामंडळाकडून उद्यापासून (दि.१५) नागपूर ते शिर्डी या मार्गावर शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे.

ST will run on Samruddhi Mahamarg! Nagpur-Shirdi bus service to start from tomorrow | समृद्धी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट! उद्यापासून नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ

समृद्धी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट! उद्यापासून नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ

Next

मुंबई : नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग निर्माण करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते सदर महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. महामार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी एसटी महामंडळाकडून उद्यापासून (दि.१५) नागपूर ते शिर्डी या मार्गावर शयन आसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. या बसमध्ये प्रवाशांना २X१ पद्धतीची ३० आसने (पुशबॅक पद्धतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून १५ शयन आसने (Sleeper)  आहेत.

सदरची बससेवा ही नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता सुटेल व पहाटे ०५.३० वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल. सदरच्या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये ४.१५ तास बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ती १३०० रुपये व मुलांसाठी ६७० रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तसेच, ७५ वर्षावरील ज्येष्ठांना तिकिट दरात १०० टक्के मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५० टक्के सवलत असणार आहे.

याबरोबरच, नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) या मार्गावरही समृद्धी महामार्गाद्वारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे. सदरची बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. सदर बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४.४० तास इतकी बचत होणार आहे. 

सदर बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ती ११०० रुपये व मुलांसाठी ५७५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे, तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ती ९४५ रुपये व मुलांसाठी ५०५ रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Web Title: ST will run on Samruddhi Mahamarg! Nagpur-Shirdi bus service to start from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.