एसटी कामगार संपावर?
By Admin | Published: December 13, 2015 01:08 AM2015-12-13T01:08:48+5:302015-12-13T01:08:48+5:30
एसटी कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के पगारवाढीचा निर्णय येत्या १७ डिसेंबरपर्यंत न घेतल्यास त्याच दिवसापासून एसटी कामगार संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के पगारवाढीचा निर्णय येत्या १७ डिसेंबरपर्यंत न घेतल्यास त्याच दिवसापासून एसटी कामगार संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिला. या संपात कामगारांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार हे शासकीय व इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहेत. वाढती महागाई, कौटुंबिक अडचणी, गृहकर्ज, वैद्यकीय खर्च, पाल्यांचे शिक्षण, आदीमुळे ते कर्जबाजारी झाले आहेत.
आंध्र-तेलंगणामध्ये तेथील एसटी कर्मचाऱ्यांना ४४ टक्के पगारवाढ दिली आहे. परंतु महाराष्ट्रातीलच एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय का, असा सवालही त्यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही पाचवा, सहावा वेतन आयोग लागू झालेला नाही. त्यातही मान्यताप्राप्त संघटनेने दिलेली आश्वासनेही अद्याप पूर्ण केलेली नाहीत. एसएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ मिळविण्यासाठी इंटकच्या वतीने वेळोवेळी एसटी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आगारपातळीपर्यंत व विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले आहे. परंतु, अद्यापही एसटी प्रशासन अथवा शासनाकडून लक्ष दिले गेलेले नाही. २०१२-२०१६ कामगार करार रद्द करून २०१२-२०१६ या कालावधीकरिता २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यासंदर्भात राज्यभरातून ५३ हजार ५०३ कर्मचाऱ्यांनी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना पत्रही दिले आहे. परंतु, अद्यापही त्यावर तोडगा काढण्यात न आल्याने हे संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.