ST Workers Strike : संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा निर्णय २० तारखेनंतर; परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 06:10 AM2021-12-18T06:10:59+5:302021-12-18T06:11:19+5:30
सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आणि सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचं परब यांचं वक्तव्य.
मुंबई : एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला २० डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात आपले प्राथमिक म्हणणे मांडायचे आहे. त्या अनुषंगाने सर्व कायदेशीर चर्चा सुरू आहे. शिवाय, संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावायचा की नाही, यावरही चर्चा सुरू असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळे तूर्तास २० तारखेपर्यंत मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कर्मचाऱ्यांचा संप, न्यायालयातील सुनावणी आदींवर चर्चा झाली. यानंतर परब म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याबाबत चर्चा सुरू आहे. सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आणि सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. विलीनीकरणाच्या प्रश्नावर न्यायालयाने समिती नेमली आहे. त्याला १२ आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानंतर २० तारखेला प्राथमिक मत काय आहे याबाबतचा अहवालही मागितला. या सर्व कायदेशीर बाबींच्या चर्चेसाठी आजची बैठक होती, असे त्यांनी सांगितले. कामावर न परतलेल्या दहा हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे, तर अडीच हजार कंत्राटी कामगारांच्या सेवा समाप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
६३ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या दीड महिन्यापासून ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरूच आहे. एसटी महामंडळाने शुक्रवारी २२ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ आणि ५० कर्मचाऱ्यांना निलंबित केले. आतापर्यंत दहा हजार निलंबित कर्मचाऱ्यांपैकी ६३ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता एकूण
आकडा ३५५ इतका झाला आहे.
- वेतनवाढ देऊनही संप मागे न घेतल्याने एसटी महामंडळाने कारवाई सुरु केली आहे. महामंडळाने आतापर्यंत राेजंदारीवरील २ हजार ५५ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून, १० हजार ७०१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २ हजार ७८८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, निलंबनाच्या कारवाईनंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.
- १० हजार १८० निलंबित कामगारांना सोमवारपर्यंत शेवटची संधी देण्यात आली होती. त्यातून सोमवारी फक्त १४९ निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी महामंडळाने २२ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.
५१ कर्मचारी निलंबित
गेल्या ५० दिवसांत एसटी महामंडळाकडून आतापर्यत १० हजार ७०१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर एसटी महामंडळाने शुक्रवारी ५१ एसटी कर्मचारी निलंबित केले असून, २२ निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४४ इतकी झाली आहे.