ST Workers Strike : राज्यातील ४५ आगारातील ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन; २५० पैकी २४७ डेपो बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 08:07 PM2021-11-09T20:07:03+5:302021-11-09T20:07:20+5:30
ST Workers Strike : विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.
विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही. अखेर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारत राज्यभरातील ४५ आगारातील ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी २४७ हून अधिक आगारातील वाहतूक ठप्प झाली आहे.
जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करत नाही, तो पर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. न्यायालयानेही एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचे निर्देश दिले होते, मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे. अशातच आता एसटी महामंडळानेही कर्मचाऱ्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे
तसेच, औद्योगिक न्यायालयाने आणि उच्च न्यायालायानेही कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन चुकीचे असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर जर कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता राज्य शासनाने सरकारने प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्याचा दिली आहे. दरम्यान, कोल्हापूर-गारगोटी, कागल (अंशतः सुरु), नाशिक - इगतपुरी हे आगार सध्या सुरू आहेत.
विभाग - आगार- निलंबीत कर्मचारी संख्या
नाशिक- कळवण-१७
वर्धा - वर्धा ,हिंगणघाट-४०
गडचिरोली- अहेरी,ब्रम्हपुरी,गडचिरोली- १४
लातूर- औसा, उदगीर, निलंगा,अहमदपूर, लातूर - ३१
नांदेड-किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड,हादगाव,मुखेड,बिलोली, देगलूर - ५८
भंडारा- तुमसर,तिरोडा, गोंदिया - ३०
सोलापूर - अक्कलकोट- २
यवतमाळ -पांढरकवडा, राळेगण , यवतमाळ - ५७
औरंगाबाद - औरंगाबाद १ - ५
परभणी - हिंगोली, गंगाखेड- १०
जालना -आफ्रबाद, अंबड -१६
नागपूर - गणेशपेठ, घाटरोड,इमाम वाडा, वर्धमान नगर- १८
जळगाव- अमळनेर-४
धुळे -धुळे -२
सांगली - जत ,पलूस, इस्लामपूर, आटपाडी
एकूण- ३७६