एसटी कामगारांना सण उचल मिळणार
By admin | Published: November 2, 2015 02:46 AM2015-11-02T02:46:38+5:302015-11-02T02:46:38+5:30
एसटी महामंडळ तोट्यात असल्याने दिवाळी भेट किंवा सानुग्रह अनुदान मिळणार नाही, असा पवित्रा परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला होता.
मुंबई : एसटी महामंडळ तोट्यात असल्याने दिवाळी भेट किंवा सानुग्रह अनुदान मिळणार नाही, असा पवित्रा परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घेतला होता. यामुळे एसटी कामगारांकडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच, दहा हजार रुपये सण उचल देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला, तसे परिपत्रकच जारी केले आहे. १ लाख ७ हजार कामगारांना त्याचा फायदा मिळणार आहे.
एसटीतील सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना सरसकट १५ हजार किंवा दहा हजार रुपये दिवाळी भेट देण्यात यावी, अशी मागणी सर्व एसटी कामगार संघटनांकडून करण्यात आली होती. सानुग्रह अनुदानास पात्र ठरणारे एसटीत फारच कमी कामगार असून, त्यामुळे सरसकट दिवाळी भेट देण्याच्या या मागणीला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नकार दिला आणि एसटी तोट्यात असल्याचे कारण सांगितले. त्यामुळे कामगार वर्गात नाराजीचा सूर उमटला होता. आता मात्र, एसटी महामंडळाने शासन निर्णय आणि कामगार करारानुसार मूळ वेतन २५,५८१ रुपये अथवा त्यापेक्षा कमी असलेल्या कर्मचारी, कामगारांना दहा हजार रुपये सण उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. सानुग्रह अनुदानाबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. सानुग्रह अनुदान मिळणारे ४४१ कामगार आहेत.
कामगार करारात असलेल्या तरतुदीनुसार हे पैसे एसटी कामगारांना मिळणार आहेत. मात्र, सानुग्रह अनुदान किंवा दिवाळी भेट देण्याबाबत एसटीकडून निर्णय झालेला नाही, असे शिवाजीराव चव्हाण (महाराष्ट्र एसटी कामगार संघटना- अध्यक्ष) यांनी सांगितले.