एसटी कामगारांच्या रजा मंजूर होणार नाहीत

By Admin | Published: April 25, 2016 05:38 AM2016-04-25T05:38:41+5:302016-04-25T07:35:50+5:30

करारात वगळलेली बारा कलमे पूर्ववत ठेवावीत, यासह अन्य काही मागण्यांसाठी २६ एप्रिल रोजी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून एक दिवसीय रजा आंदोलन

ST workers will not be allowed leave | एसटी कामगारांच्या रजा मंजूर होणार नाहीत

एसटी कामगारांच्या रजा मंजूर होणार नाहीत

googlenewsNext

मुंबई : २५ टक्के अंतरिम वाढ द्या, करारात वगळलेली बारा कलमे पूर्ववत ठेवावीत, यासह अन्य काही मागण्यांसाठी २६ एप्रिल रोजी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून एक दिवसीय रजा आंदोलन पुकारले आहे. मात्र, या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कामगारांच्या रजा मंजूर होणार नाहीत, असे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आतापर्यंत दहा हजार नाही, तर २ हजार ७५२ रजा अर्ज प्राप्त झाले असून, ते नामंजूर करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
विविध मागण्यांसाठी मान्यताप्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून एक दिवसीय रजा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. रजा घेऊन मोठ्या संख्येने कामगार एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयावर धडकतील. या आंदोलनात जास्तीत जास्त कामगारांना सहभागी करण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न सुरू आहेत. आंदोलनात सहभागी होण्यासाठी जवळपास दहा हजार कामगारांकडून रजेचे अर्ज देण्यात आल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला होता. मात्र, एसटी महामंडळाने हा दावा खोडून काढला असून, २ हजार ७५२ रजा अर्जच प्राप्त झाल्याचे सांगितले आणि प्रशासनाने ते नामंजूरही केले आहेत. एक दिवसीय आंदोलन होणार असल्याने आणि या आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रविवारी परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दिवाकर रावते यांनी सांगितले की, कामगारांना त्यांचे हित कशात आहे हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे आंदोलनात सहभागी झाले पाहिजे की नाही, हे तेच ठरवतील. महत्त्वाची बाब म्हणजे, होणाऱ्या एक दिवसीय रजा आंदोलनासाठी कोणत्याही कामगारांची रजा मंजूर केली जाणार नाही. आंदोलनात सहभागी झाल्यास आणि प्रशासनाचे नुकसान झाल्यास तेच जबाबदार ठरतील, असे रावते म्हणाले. आंदोलन झाले, तरी आमच्याकडून मात्र मेस्मा लावला जाणार नाही, असेही रावते यांनी स्पष्ट केले. 

Web Title: ST workers will not be allowed leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.