नागपूरात डाळीची साठेबाजी सुरूच
By admin | Published: July 14, 2016 09:21 PM2016-07-14T21:21:39+5:302016-07-14T21:21:39+5:30
बाजारात तूर व चणा डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पुरवठा विभागाने गुरुवारी वडोदा येथील शुभम लॉजिस्टीक वेअर हाऊसच्या गोदामावर
२०६ क्विंटल तूर, ८५० क्विंटल चणा साठा जप्त : जिल्हा प्रशासनाची कारवाई
नागपूर : बाजारात तूर व चणा डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पुरवठा विभागाने गुरुवारी वडोदा येथील शुभम लॉजिस्टीक वेअर हाऊसच्या गोदामावर धाड टाकली. या धाडीमध्ये २०६ क्विंटल तुरीचा साठा व ८५० क्विंटल चणा जप्त करण्यात आला आहे.
वडोदा येथे शुभम लॉजिस्टीक वेअर हाऊस या नावाने अन्नधान्य साठवणुकीसाठीचे गोदाम असून त्या ठिकाणी मे. करण टेड्रींग कंपनीचे प्रोपा. राकेश ओमप्रकाश अग्रवाल यांनी ४५० क्विंटल चणा तसेच मे. कल्पना ट्रेडींग कंपनीचे प्रोपा. लक्ष्मीकांत मेघराज तेलमासरे यांनी ४०० क्विंटल चणा साठवणूक करुन ठेवल्याचे आढळून आले.
याबाबत आवश्यक असलेला रेकार्ड जसे साठा रजिस्टर, बिल बुक, विक्री रजिस्टर, सी फार्म तपासणीच्या वेळी सादर न केल्यामुळे हा साठा जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केला. तसेच मे. वासुदेव अॅग्रो यांनी २०६ क्विंटल तुरीचा साठा या गोदामामध्ये विनापरवाना ठेवल्याने हा साठादेखील जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केला. जप्त साठ्याची अंदाजे किंमत ८७०० रुपये प्रती क्विंटल तूर याप्रमाणे व चणा अंदाजे किंमत ८ हजार रुपये प्रती क्विंटल याप्रमाणे एकूण ८५ लाख ९२ हजार २०० रुपये इतकी आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी एन.आर. वंजारी, निरीक्षक अधिकारी पी.एल.कुबडे, पुरवठा निरीक्षक प्रशांत शेंडे यांनी केली. पुढील कारवाई जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या तरतुदीनूसार करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.