रायगड जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांचा मार्च महिन्याचा सुमारे २५ कोटी रुपयांचा पगार थकला आहे.
By admin | Published: April 27, 2016 03:21 AM2016-04-27T03:21:46+5:302016-04-27T03:21:46+5:30
रायगड जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांचा मार्च महिन्याचा सुमारे २५ कोटी रुपयांचा पगार थकला आहे.
आविष्कार देसाई,
अलिबाग-रायगड जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षकांचा मार्च महिन्याचा सुमारे २५ कोटी रुपयांचा पगार थकला आहे. सेवार्थ प्रणालीद्वारे पगार होत असल्याने मार्च महिन्यापाठोपाठ आता एप्रिल महिन्यातील २५ कोटी रुपयांचे पगार थकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचारी आणि शिक्षक मेटाकुटीला आले आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा गाडा ओढण्याचे काम विविध कर्मचारी यांच्यामार्फत होते. सरकारच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचे काम त्यांच्याकडून होत असते.
ग्रामीण भागाचा कणा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून पगार वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी संघटनेमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. सरकारने वेळेवर वेतन अदा करावे अशी मागणी केली जात आहे. सरकारचे मार्च एंडिंगचे काम अद्याप सुरु असून सेवार्थ प्रणालीद्वारे पगार होतात. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे पगार होण्याला उशीर होत असल्याचे अर्थ विभागाकडून सांगण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन रायगडचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
रायगड जिल्हा परिषदेमध्ये सुमारे ११ हजार कर्मचारी आणि शिक्षक आहेत. मार्च महिन्याच्या पगाराचा अद्याप पत्ता नाही. मार्च महिन्याचा फक्त शिक्षकांचाच सुमारे २० कोटी रुपयांचा पगार आहे, तर उर्वरित पाच कोटी रुपये कर्मचाऱ्यांचा असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. मार्चचा पगार अद्याप मिळालेला नाही.