‘वेकोलि’त कर्मचारी भरती घोटाळा
By admin | Published: October 18, 2015 02:23 AM2015-10-18T02:23:09+5:302015-10-18T02:23:09+5:30
निवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ‘अनफिट’ दाखवून आपल्या जागेवर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये (वेकोलि) सग्यासोयऱ्यांची नियुक्ती करून घेतल्याची धक्कादायक
- नरेश डोंगरे, नागपूर
निवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ‘अनफिट’ दाखवून आपल्या जागेवर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये (वेकोलि) सग्यासोयऱ्यांची नियुक्ती करून घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्या चार वर्षांत ६०० पेक्षा जास्त जणांनी अशा प्रकारे ‘वेकोलि’त वर्णी लावली आहे.
संबंधित पदभरती घोटाळ्याची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर केंद्रीय अण्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. निवृत्तीला शेवटचे काही वर्ष शिल्लक असताना प्रकृती अस्वास्थ्याची कुरबूर सुरू करायची. दर महिन्याला वेगवेगळे प्रमाणपत्र गोळा करायचे. सातत्याने काहीतरी कारण दाखवून काम होत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत आणायचे आणि स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज द्यायचा. सोबतच आपला पाल्य किंवा जवळच्या नातेवाईकाला आपल्या जागेवर नियुक्त करण्याचाही विनंती अर्ज द्यायचा, असे प्रकार काही वर्षात ‘वेकोलि’त वाढले आहेत. त्याची फारशी चौकशी तसेच आडकाठी होत नसल्याने तीन-चार वर्षांत ६०० ते ७०० जणांनी त्यांच्या नातेवाईकांना नोकरीवर लावले. ‘वेकोलि’च्या विदर्भातील अनेक खाणींमध्ये हा ‘अर्थपूर्ण गैरप्रकार’ बिनदिक्कत सुरू होता.
मोठी साखळी कार्यरत
घोटाळ्याची कुणकुण लागल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली. चौकशीनंतर या घोटाळ्यात एक मोठी साखळीच कार्यरत धक्कादायक वास्तव उघड झाले.
२० जणांविरुद्ध गुन्हा
संबंधित गैरप्रकारामुळे पात्र उमेदवारांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा निष्कर्ष सीबीआय अधिकाऱ्यांनी नोंदवला. पहिल्या टप्प्यात सीबीआयने २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे.
होय, बोगस नियुक्तीचा घोटाळा उघड झाला आहे. सीबीआयने २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे यापेक्षा अधिक काही सांगणे योग्य होणार नाही.
- संदीप तामगाडगे, पोलीस अधीक्षक, सीबीआय, नागपूर युनिट