संपात फूट!
By admin | Published: June 4, 2017 06:19 AM2017-06-04T06:19:17+5:302017-06-04T06:19:17+5:30
संपकरी शेतकऱ्यांची समिती व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय मान्य न झाल्याचे सांगत शनिवारी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले.
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संपकरी शेतकऱ्यांची समिती व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय मान्य न झाल्याचे सांगत शनिवारी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले. एकीकडे संप मिटल्याची घोषणा आणि दुसरीकडे संप कायम ठेवण्याची भूमिका जाहीर झाल्याने संपात उभी फूट पडल्याचे चित्र आहे.
पुणतांब्यात ग्रामसभा झाली, त्यात संपाचा निर्धार कायम ठेवण्यात आला. दुपारनंतर नगर जिल्ह्यात पुन्हा बैठकांना वेग आला. नाशिक जिल्ह्यातही आंदोलनाची धग कायम होती. नैताळे येथे आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांनी लाठीमार केला. कोल्हापुरात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदे फेकले. साताऱ्यातही बंद पाळण्यात आला.
पुण्यात शनिवारी पिशवीबंद दूधपुरवठा विस्कळीत झाला. खान्देशातही संपाची धग कायम होती. बाजार समित्यांमध्ये अल्प प्रमाणात व्यवहार झाले.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत संप सुरू होता. सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे औरंगाबादेतील क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. नागपुरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. रस्त्यावर दूध फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. अकोला जिल्ह्यात अकोटमध्ये दूध उत्पादकांनी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून रस्त्यावर दूध, भाजीपाला फेकला.
शेतकरी युद्धात जिंकला;
तहात हरला - पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना गंडवले, असा आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला आहे. शेतकरी संपामागे काँग्रेस व राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप करणे म्हणजे पोरकटपणा आहे. शेतकरी युद्धात जिंकला पण तहात हरला, असे पवार म्हणाले. कर्जमाफी केवळ अल्पभूधारकांनाच का? सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती, असे ते म्हणाले.