साहित्य, लोककलेवर असेल संमेलनाचे स्टेज
By Admin | Published: January 16, 2017 03:48 AM2017-01-16T03:48:14+5:302017-01-16T03:48:14+5:30
डोंबिवलीतील साहित्य संमेलनाच्या स्टेजच्या आखणीत साहित्य आणि लोककलेचा संगम पाहायला मिळेल.
जान्हवी मोर्ये,
डोंबिवली- डोंबिवलीतील साहित्य संमेलनाच्या स्टेजच्या आखणीत साहित्य आणि लोककलेचा संगम पाहायला मिळेल. प्रवेशद्वार हे छतरूपी पुस्तक उघडल्यासारखे दर्शविले जाणार आहे आणि त्यांच्या बाजूला पुस्तके असतील, अशी माहिती कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी दिली.
साहित्य संमेलनाच्या स्टेजच्या उभारणीचे काम हळूहळू गती घेत आहे. त्याचे काम धबडे यांच्यावर सोपवण्यात आले आहे. संमेलनाचा मंडप आणि स्टेजसाठी साहित्य व लोककला ही थीम घेण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला आदिवासी कलेचा वापर केला जाईल. त्यात वारली पेटिंगचा समावेश असेल. प्रवेशद्वारातून आत जाताच डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेले गणेश मंदिर उभारण्यात येईल. संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींची मंदिरे साकारण्यात येतील. ज्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत, अशा संताच्या मूर्ती साकारल्या जातील, असा तपशील पुरवून ते म्हणाले,
मंदिराच्या मागे उजव्या बाजूला मोकळ्या जागेत साहित्य पार्क साकारले जाईल. या पार्कलगत साहित्य ज्या लेखणीतून पजरते तो लेखणीरुपी भव्य टॉवर असेल. त्या टॉवर व पार्कमध्ये जाऊन साहित्य रसिक सेल्फी काढू शकतात. साहित्य पार्कमध्ये पु. ल. देशपांडे, शं. ना. नवरे, पु. भा. भावे यांसारख्या आठ ते दहा दिग्गज साहित्यिकांच्या भावमुद्रा असलेली शिल्पे असतील. त्यात मॉर्निंग वॉक करणारे पुलं, बाकावर बसलेले शं. ना. नवरे असतील. त्यांची रचना अशी असेल, की त्यांच्यासोबत रसिक सेल्फी घेऊ शकतील. मुख्य मंडपामागे ग्रीन रुम असेल. मुख्य स्टेज लायब्ररीच्या शेल्फसारखे असेल आणि त्यांच्या मधल्या रकान्यात संमेलनाचे बोधचिन्ह आकाराला येईल. स्टेजवर मान्यवर साहित्यिकांचे फोटो असतील. स्टेजसमोरच उजव्या बाजूला साहित्य रसिकांच्या बसण्याची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला साहित्यिक व्यासपीठावरून रसिकांना संबोधित करतील. तेथेही पुस्तके ठेवली जातील. सर्वांत वरचे पुस्तक उलगडल्यावर त्यात संमेलनाचे बोधचिन्ह असेल. या स्टेजच्या विरूध्द बाजूला सरस्वती देवीची मूर्ती असेल. स्टेजला लागून २५० स्टॉल्स असतील. एक कवी कट्टा, वाचन कट्टा असेल. मुख्य मंडपाला लागूनच कॅफे हाऊस व खानपानाची व्यवस्था राहील. जवळच असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात काही कार्यक्रम होणार असल्याने फुले नाट्यमंदिरातील स्टेजची पार्श्वभूमीही साहित्याची असेल, असे धबडे यांनी सांगितले. क्रीडा संकुलातील भव्यदिव्य स्टेज आणि मंडप उभारणीचे काम २५ जानेवारीपासून सुरु होईल, असे ते म्हणाले.
>सुरक्षेवर काटेकोर लक्ष : स्टेज आणि मंडप तयार करताना आग प्रतिबंधक साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रात अशा प्रकारचे स्टेज आणि मंडप उभारण्यास किमान ५० लाखांचा खर्च येतो. पण साहित्य संमेलनाचे स्टेज व मंडप उभारण्यात नफा कमाविणे हा माझा उद्देश नसल्याने काटकसर करुन कमीत कमी खर्चात उत्तम स्टेज व मंडप उभारण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. डोंबिवलीतील यापूर्वीच्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या स्टेज व मंडपाची स्तुती झाली होती. तोच पायंडा साहित्य संमेलनातही पार पडेल. अनेक मूर्तीकारांनी मूर्ती तयार करुन देण्याची तयारी दर्शविली आहे, हे कलाप्रेमी डोंबिवलीचे उत्तम लक्षण आहे. त्यामुळे स्टेज व मंडप लक्षवेधी, स्मरणीय असेल, असेही धबडे यांनी निदर्शनास आणले.