तांदूळ महागण्याच्या अहवालावरून संभ्रम
By Admin | Published: November 17, 2015 01:42 AM2015-11-17T01:42:09+5:302015-11-17T01:42:09+5:30
डाळींसह कांदा व इतर वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना गत वर्षभरामध्ये फक्त तांदळाचे दरच नियंत्रणात राहिले आहेत. एप्रिलपासून तांदळाच्या किमती वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत.
- नामदेव मोरे, नवी मुंबई
डाळींसह कांदा व इतर वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना गत वर्षभरामध्ये फक्त तांदळाचे दरच नियंत्रणात राहिले आहेत. एप्रिलपासून तांदळाच्या किमती वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत. परंतु उद्योग मंडळ असोचेमने पुढील महिन्यात तांदळाचे दर वाढणार असल्याचा अहवाल दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये दरवाढीची शक्यता वाटत नसल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या अहवालाविषयी संभ्रम निर्माण झाला असून कृत्रिम दरवाढ होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. सध्या तांदळाचे दर स्थिर आहेत.
एप्रिलमध्ये होलसेल मार्केटमध्ये ७५ ते १०० रुपयांना विकला जाणारा बासमती तांदूळ आता ६० ते ८५ रुपयांना विकला जात आहे. २५ ते ३८ रुपयांना विकला जाणारा मोगरा आता १९ ते २४ रुपये किलो दराने विकला जात आहे. दुबार, तिबार, मोगरा, आयआर ८, एसएलओ या तांदळाच्या किमतीही स्थिरच आहेत. असे असताना उद्योग मंडळ असोचेमने पुढील महिनाभरामध्ये तांदळाच्या दरात वाढ होणार असल्याचा
अहवाल दिला आहे. या अहवालामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण
झाले आहे. व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता सद्यस्थितीमध्ये बाजारभाव वाढण्याची काही शक्यता वाटत नाही. उत्पादन किंवा साठा कमी आहे याविषयी ठोस माहिती नाही. कोणत्या आधारावर तांदूळ महाग होणार याविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे.
मुंबई बाजार समितीमधील अधिकाऱ्यांनी याविषयी सांगितले की, आम्ही मार्केटमध्ये सर्वेक्षण केले. एप्रिलपासून तांदळाच्या दरामध्ये अजिबात वाढ झालेली नाही. बाजारभाव कमी झाले आहेत. नजीकच्या काळात भाववाढ होण्याची शक्यता वाटत नाही. या अहवालामुळे सर्वांमध्ये संभ्रमाची स्थिती असल्याचे मत व्यक्त केले आहे. हा अहवाल कशाच्या आधारावर केला आहे व महागाई वाढणार हे कसे निश्चित केले याविषयी सविस्तर माहिती सर्वांसमोर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मतही एपीएमसीमधील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
टंचाई होण्याची शक्यता
जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारामध्ये महत्त्वाचे मंत्री, संघटना यांनी एखाद्या वस्तूचे दर वाढणार असे सांगितले की, काही दिवसांमध्ये त्याचे परिणाम दिसू लागतात.
अनेक वेळा अशा प्रकारच्या वक्तव्यानंतर कृत्रिम भाववाढ होत असते. साठेबाजीही वाढत असते. तांदळाच्या भाववाढीच्या अहवालाचाही गैरफायदा घेऊन कृत्रिम भाववाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.