संमेलनात स्टॉलधारक आक्रमक
By Admin | Published: February 8, 2015 11:32 PM2015-02-08T23:32:33+5:302015-02-08T23:32:33+5:30
नाट्यनगरीच्या आवारात स्टॉलची व्यवस्थित मांडणी नाही, नियोजित कार्यक्रमांची ठिकाणे बदलल्याने स्टॉलकडे कुणी फिरकले नसल्यामुळे विक्रेत्यांनी पैसे परत मागितले.
प्रकाश बेळगोजी, बेळगाव, बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी
नाट्यनगरीच्या आवारात स्टॉलची व्यवस्थित मांडणी नाही, नियोजित कार्यक्रमांची ठिकाणे बदलल्याने स्टॉलकडे कुणी फिरकले नसल्यामुळे विक्रेत्यांनी पैसे परत मागितले.
स्टॉलधारकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ‘स्टॉलवर जाऊन खरेदी करा, खा-प्या’ असे आवाहन करण्याची वेळ नाट्य परिषदेच्या अध्यक्षांवर आली.
नाट्य नगरीच्या आवारात ७५ स्टॉल आहेत. खाद्य पदार्थांबरोबरच कपडे, खेळणी आदींचे स्टॉल आहेत. या विक्रेत्यांकडून तीन दिवसांसाठी ५ हजार रुपये भाडे घेतले आहे. बेळगाव तसेच बाहेरगावाहूनही लोकांचे स्टॉल्स् आहेत.
शुक्रवार-शनिवारी विक्रेत्यांकडील वस्तूंची विशेष विक्री झालीच नाही. पण रविवार असल्याने आणि सकाळपासून कार्यक्रम असल्याने विक्री जास्त होईल, या अपेक्षेने खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी जास्त प्रमाणात तयार करुन ठेवले होते. संयोजकांनी मुख्य सभागृहातील कार्यक्रम अचानक दुसऱ्या सभागृहात घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार उपस्थित प्रेक्षक दुसऱ्या स्थळी निघून गेले.
दोन दिवसांपासून प्रेक्षक न फिरकल्याने आणि आज स्थळ बदल्याने स्टॉलधारकांच्या संतापाचा उद्रेक झाला. सर्व विक्रेत्यांनी एकत्र येऊन नाट्य परिदषेच्या अध्यक्ष वीणा लोकूर यांच्याशी चर्चा करण्याची तसेच स्टॉलचे पैसे परत द्या, अशी मागणी केली. नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रश्नी मध्यस्थी केली. हा वाद मिटावा यासाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यावर, संमेलन नगरीच्या आवारात स्टॉल उभारले, तेथे खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत, पुस्तकांची विक्री सवलतीत आहे, असे सांगण्याची नामुष्की आली. (खास प्रतिनिधी)