मोबाइल चोरट्यांचा रेल्वे प्रवाशावर लाठीहल्ला
By admin | Published: June 23, 2016 12:56 AM2016-06-23T00:56:23+5:302016-06-23T00:56:23+5:30
आकोट फैल रेल्वे पुलाखालील घटना; दोघे ताब्यात
अकोला: कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसने जळगाव खान्देश येथे जात असलेल्या एका प्रवाशाच्या हातातील मोबाइल पळविण्यासाठी रेल्वेखाली उभ्या असलेल्या तिघांनी सदर प्रवाशावर लाठीहल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या लाठीहल्ल्यामुळे प्रवासी रेल्वेतून खाली कोसळल्याने जखमी झाले. आकोट फैल रेल्वे पुलाखाली रेल्वे पटरीवर उभ्या असलेल्या तीन चोरट्यांनी हा प्रताप केला असून यामधील दोघांना जीआरपीने तातडीने अटक केली आहे.
जळगाव खान्देश जिल्हय़ातील जामनेर तालुक्यातील फतेपूर येथील रहिवासी अविनाश मोहन पाटील हे महाराष्ट्र एक्स्प्रेसने जळगाव येथे जात असताना ते बोगीच्या गेटमध्ये मोबाइलवर बोलत उभे होते. महाराष्ट्र एक्स्प्रेस आकोट फैलपुलानजीक गेल्यानंतर तेथे पटरीवर उभ्या असलेल्या तिघांनी त्यांच्या हातावर काठीने हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्लय़ामुळे अविनाश पाटील यांच्या हातातील मोबाइल खाली कोसळला. मोबाइल पकडण्यासाठी गेलेल्या पाटील यांचाही तोल गेल्याने ते रेल्वेखाली कोसळले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच जीआरपी घटनास्थळावर दाखल होऊन त्यांनी संशयावरून दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणी पाटील यांच्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९३ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी शेख कय्युम शेख मोहम्मद व गणेश ऊर्फ चंदर प्रजापती या दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार आहे. ही कारवाई जीआरपीचे आर. टी. वानखडे यांच्या मार्गदर्शनात सतीश चव्हाण, गौतम शिरसाट, शरद जुनगडे व पथकाने केली.