माजी आमदाराच्या पत्नीच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीला मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 04:56 PM2021-08-01T16:56:24+5:302021-08-01T16:57:54+5:30
भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन यांच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीला ९७ लाख ४० हजार थकीत मुद्रांक शुल्क व त्यावर २००८ साला पासून प्रतिमाह २ टक्के प्रमाणे दंड २१ ऑगस्ट पर्यंत भरण्याची नोटीस मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे यांनी बजावली आहे.
मीरा रोड -भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन यांच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीला ९७ लाख ४० हजार थकीत मुद्रांक शुल्क व त्यावर २००८ साला पासून प्रतिमाह २ टक्के प्रमाणे दंड २१ ऑगस्ट पर्यंत भरण्याची नोटीस मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे यांनी बजावली आहे. दंडासह ही रक्कम काही कोटीत आहे.
मीरारोड पूर्वेला सेव्हन स्क्वेअर अकादमी ही शाळा आहे. सदर जमीन व शाळा इमारत ही भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनी कडून त्यांची पत्नी सुमन मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीने २००८ साली ३० वर्षाच्या नाममात्र भाडेपट्ट्याने घेतली.
भाडेकरार करताना नियमानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क भरण्यात आला नसल्याने शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी कारवाई करावी आणि मुद्रांक शुल्क दंडा सह वसूल करावे अश्या तक्रारी २०१३ साला पासून केल्या जात होत्या.
ठाणे शहरचे प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी तानाजी गंगावणे यांनी २३ जुलै रोजीच्या तारखेची नोटीस सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीच्या सुमन मेहता यांना बजावली आहे. सदर नोटीस मध्ये या बाबत २०१४ साली तक्रार झाली होती. १० नोव्हेंबर २०१६ रोजी सुनावणी नोटीस बजावण्यात आली होती. २६ ऑक्टोबर २०२० रोजी अंतिम आदेश देण्यात आला होता.
९९२६ चौ मी जमीन क्षेत्रातील एकूण ७८ हजार चौ मी ची शाळा इमारत आहे. त्याचे मुद्रांक शुल्क ९७ लाख ४० हजार १०० रुपये इतके भरण्यात आले नव्हते. सदर मुद्रांक शुल्क सह दस्त केल्याच्या तारखे पासून प्रतिमाह २ टक्के प्रमाणे दंड अशी रक्कम नोटीस बजावल्याच्या तारखे पासून ३० दिवसात भरावी. रक्कम भरली नाही तर सक्तीच्या कारवाईचा इशारा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी नोटीस मध्ये दिला आहे.