विकासासाठी जमीन दिल्यास मुद्रांक शुल्कात सवलत
By admin | Published: May 15, 2014 02:30 AM2014-05-15T02:30:10+5:302014-05-15T02:30:10+5:30
एखाद्या व्यक्तीने फ्लॅट स्कीमसाठी आपली जमीन बिल्डरला दिली तर त्याच जागेवर त्या व्यक्तीला जे फ्लॅट मिळतील, त्यावर तिला प्रचलित दराने मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.
मुंबई : एखाद्या व्यक्तीने फ्लॅट स्कीमसाठी आपली जमीन बिल्डरला दिली तर त्याच जागेवर त्या व्यक्तीला जे फ्लॅट मिळतील, त्यावर तिला प्रचलित दराने मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. बर्याचदा आपल्या मालकीची जमीन बिल्डरला विकासासाठी दिली जाते. त्यासाठी करार केला जातो. या करारानुसार बरेचदा मूळ जमीन मालकाला बिल्डर घरे किंवा फ्लॅट देतो. या घरावर इतर घर मालकांप्रमाणे मूळ जमीन मालकालादेखील मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. प्रभा लक्ष्मण घाटे विरुद्ध राज्य शासन या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता मूळ मालकांना आपल्या जमिनीवर विकसित झालेल्या घरांपैकी त्यांना मिळालेल्या घरांसाठी इतरांप्रमाणे मुद्रांक शुल्क द्यावे लागणार नाही, असा आदेश महसूल विभागाने गेल्या आठवड्यात काढला. मूळ जमीन मालक आणि बिल्डर यांच्यात जेव्हा जमीन विकासासाठीचा करार होतो तेव्हा बिल्डरने ५.५० टक्के मुद्रांक शुल्क भरलेले असते. त्यामुळे त्याच जागेवर विकसित झालेल्या घरांपैकी जी घरे मूळ जमीन मालकाला दिली जातील त्यावर मुद्रांक शुल्क इतरांप्रमाणे लावू नये, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला होता आणि उच्च न्यायालयाने तो मान्य केला होता. प्रभा लक्ष्मण घाटे यांच्या प्रमाणेच असलेल्या इतर प्रकरणांमध्ये न्याय लावावा. केवळ महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानच्या कलम ४ नुसार मुद्रांक शुल्क आकारावे, असे महसूल विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कलमातील तरतुदीनुसार केवळ २० रुपयांच्या मुद्रांकावर व्यवहार होतील. (विशेष प्रतिनिधी)