पुन्हा उभे राहिले माळीण

By Admin | Published: April 2, 2017 02:57 AM2017-04-02T02:57:19+5:302017-04-02T02:57:19+5:30

दुर्घटनेची माहीती मिळताच स्थानिक आणि प्रशाकीय यंत्रणा घटनास्थळी पोहचली. पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या. तरीही ढिगाऱ्याखालील व्यक्तींना बाहेर

Standing again Malin | पुन्हा उभे राहिले माळीण

पुन्हा उभे राहिले माळीण

googlenewsNext

नीलेश काण्णव, घोडेगाव
दुर्घटनेची माहीती मिळताच स्थानिक आणि प्रशाकीय यंत्रणा घटनास्थळी पोहचली. पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या. तरीही ढिगाऱ्याखालील व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ शर्थिचे प्रयत्न करत होते. एनडीआरएफच्या पथकाने दुस-या दिवशी बचत कार्य सुरू केले. ८ दिवस हे कार्य सुरू होते.
दि.६ आॅगस्ट २०१४ रोजी मृतदेह शोधण्याचे काम संपले. १५१ लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची यादी ग्रामस्थ व प्रशासनाने एकत्र बसून काढली. पैकी १४६ मृतदेह मिळून आले. या बचाव कार्यात भरीव काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ राव व एनडीआरएफचे कमांडंट अलोक अवस्थी यांचे विशेष कौतुक झाले. या आठ दिवसांत विविध संस्था व लोकांनी तहानभूक विसरून पडेल ते काम येथे केले.
२ महिन्यांत माळीण ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. यासाठी माळीण फाट्यावर पत्राचे शेड बांधून येथे व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागा शोधमोहीम सुरू झाली. ६ जागा पाहिल्यानंतर १ एप्रिल २०१५ मध्ये आमडे येथे सचिन व संदीप लुमा असवले या दोन भावांनी ८ एकर जागा दिली. ही जागादेखील डोंगरउताराची असल्याने अनेक अडचणी येणार होत्या; मात्र त्या जागेशिवाय पर्याय नसल्याने ती निश्चित करण्यात आली. या जागेवर ६७ घरे व १८ मूलभूत सेवासुविधा देण्याचे नियोजन करण्यात आले. येथे माळीणसारखी घटना घडू नये यासाठी जागा सपाटीकरण करणे व संरक्षण भिंती बांधणे ही कामे तांत्रिकदृष्ट्या किचकट व मोठी होती. हे शिवधनुष्य पेलून संपूर्ण काम राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सुरू केले. यासाठी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे प्राध्यापक भालचंद्र बिराजदार व वास्तुविशारद योगेश राठी यांनी मोठे सहकार्य केले. तसेच, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, विवेक माळुंदे, एस. बी. देवढे यांनी सर्व काम करून घेतले. महसूल विभागाकडून प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार बी. जे. गोरे, रवींद्र सबनीस यांनी येणाऱ्या अडचणी सोडविल्या. महत्त्वाचे काम नायब तहसीलदार विजय केंगले यांनी केले. जागा मिळविण्यामध्ये तसेच ग्रामस्थांच्या अडचणी, तक्रारी सोडविण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पावसामुळे कामाला ६ महिने उशीर लागला. मात्र, आता अतिशय टुमदार, हिलस्टेशनसारखे नवीन माळीण उभे राहिले आहे. येथे बांधण्यात आलेली घरे ग्रामस्थांना दिली जाणार आहेत.


३० जुलै २०१४ची सकाळ, मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे कोसळलेल्या डोंगराने संपूर्ण गावालाचा गिळंकृत केले. जवळपास १५१ नागरिक या घटनेत मृत्युमुखी पडले. प्रचंड पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. अशा बिकट परिस्थितीत स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रशासनान युद्धपातळीवर मदतकार्य राबविले. या घटनेतून बचावलेल्या ग्रामस्थांना संसाराला पुन्हा उभारण्यासाठी पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या प्रकल्पात सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र, ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने प्रशासनाने माळीणशेजारीच
आमडे गावात पुन्हा नव्याने माळीण उभे राहिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील घरे ग्रामस्थांना रविवारी हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यानिमित्त ग्रामस्थ व घटना घडल्यानंतर मदतकार्यात झोकून देऊन काम केलेल्या काही व्यक्तींशी चर्चा केली असता अजूनही त्या दिवशीच्या आठवणी आल्या, की त्यांचे अंग शहारून जाते. त्या दिवशीचा पाऊस, वारा, कोसळलेला डोंगर व मदतकार्यातील आठ दिवस आठवतात. याचबरोबर छान, सुंदर डोंगराच्या कुशीत वसलेले माळीणगाव, गावातील लोक, घरे, गावात साजरे होणारे सण-उत्सवही आठवतात.

समुपदेशातून माळीणवासीयांना मानसिक आधार
पुणे : निसर्गाने केलेल्या हाहाकाराच्या आठवणी अजूनही माळीण करांच्या मनात घर करुन बसल्या आहेत. माळीणच्या दुर्घटनेत अनेक नागरिकांचे प्राण गेले. अनेकांना आपल्या जीवाभावाच्या लोकांना एका क्षणात गमवावे लागले. या धक्क्यांमधून माळीणकरांना मानसिकदृष्ट्या उभं करण्याचं काम पुण्याच्या भोई प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. मिलिंद भोई व त्यांच्या सहकाऱ्यांनी माळीणमध्ये वास्तव्य करुन बचावलेल्या नागरिकांना धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केले. त्यांना हा आघात पचवण्याची शक्ती दिली. त्याचबरोबर माळीण दुर्घटनेनंतर प्र्रतिष्ठानच्या वतीने ‘माळीण पुन्हा उभारू’ हा महत्त्वाचा, बहुउद्देशीय उपक्रम हाती घेतला. ग्रामस्थांनासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. माळीणच्या चिमुकल्यांना त्यांचे दु:ख विसरण्यासाठी ‘माळीणची मुले पुणेकरांच्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून विज्ञानाच्या अनेक गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या. त्याचबरोबर रक्षाबंधन व दिवाळी यांसारखे सण मोठ्या उत्साहात माळीणमध्ये साजरे करुन माळीणकरांच्या दु:खावर मायेची फुंकर घालण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान तर्फे करण्यात आला. प्रतिष्ठानच्या या कार्याबद्दल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे आलोक अवस्थी व अनेक संस्थांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला.

माळीणचा घटनाक्रम
३० जुलै २०१४ - आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील माळीण गावावर सकाळी ८.१५च्या सुमारास डोंगराचा काही भाग कोसळून संपूर्ण गाव गाडले गेले.
३१ जुलै २०१४ - माळीण दुर्घटनेची भीषणता गडद होत चालली होती. दुसऱ्या दिवसअखेरपर्यंत ३८ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते.
१ आॅगस्ट २०१४ - पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. पाऊस असल्यामुळे अंत्यविधी करता येत नव्हते. अडिवरे प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह साठू लागले होते. त्यांचा वास येत होता. शेवटी माळीण फाट्यावर सामूहिक अंत्यविधी करण्यात आले. तिसऱ्या दिवशी ढिगारा हटू लागल्याने आतला विध्वंस दिसत होता. तिसऱ्या दिवसापर्यंत ७० मृतदेह अढळून आले.
२ आॅगस्ट २०१४ - माळीण दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी अखेरपर्यंत ५० टक्के ढिगारा उपसण्यात आला होता. यातून ८२ मृतदेह काढण्यात आले. घटनेला चौथा दिवस झाला असल्यामुळे मृत माणसे व जनावरे यांचा वास परिसरात पसरला.
३ आॅगस्ट २०१४ - माळीण दुर्घटनेच्या पाचव्या
दिवशी ढिगाऱ्याखालून निघत असलेले मृतदेह अतिशय विदारक अवस्थेत निघू लागले होते. परिसरात पसरलेली दुर्र्गंधी, पाऊस यांचा अडथळा बचाव कार्यात येत होता. तसेच, उरलेल्या गावालाही धोका असल्यामुळे गाव रिकामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले. पाचव्या दिवसअखेर १०७ मृतदेह बाहेर काढण्यात आले.
४ आॅगस्ट २०१४ - माळीण दुर्घटनेच्या सहाव्या दिवशी सर्वांत जास्त ३१ मृतदेह बाहेर निघाले. डोंगराच्या मागच्या बाजूला झांजरे कुटुंबीयांची सलग पाच घरे होती. यात एकाच वेळेस १२ मृतदेह मिळाले. या दिवसअखेर १३४ मृतदेह हाती लागले. तसेच मृतदेह अतिशय खराब अवस्थेत निघत असल्यामुळे त्यांची डीएनए टेस्ट केली जाऊ लागली.
५ आॅगस्ट २०१४ - माळीण दुर्घटनेच्या सातव्या दिवसअखेर १४६ मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. जवळ जवळ ढिगारा उपसण्याचे काम संपत आले होते; परंतु ग्रामस्थ अजून काम सुरू ठेवावे, अशी मागणी करीत होते. त्यांची इच्छा पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी ढिगारा उपसण्याचे काम सुरू ठेवले.
६ आॅगस्ट २०१४ - माळीण गावाचे बचावकार्य आठव्या दिवशी थांबवण्यात आले. काम पूर्ण झाल्याचे सांगून १५१ लोक या दुर्घटनेत मृत पावल्याचे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले. या कामात ३२५ अधिकारी, १९०३ कर्मचारी तसेच अनेक सेवाभावी संस्था व स्वयंसेवकांनी हातभार लावला.
सष्टेंबर २०१४ मध्ये झांजरेवाडी व कोकणेवाडी येथील जागामालकांनी पुनर्वसनासाठी जागा देण्यास संमती दिली. मात्र, या जागांना ग्रामस्थांनी नकार दिला, तर अडिवरेची जागा देण्यास तेथील ग्रामस्थांनी नकार दिला.
आक्टोबर २०१४ मध्ये निवारा शेडमध्ये माळीण ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन.
१ एप्रिल २०१५ - माळीण पुनर्वसनासाठी आमडे गावाच्या हद्दीत ८ एकर जागा खरेदी.
१ जुलै २०१५ रोजी माळीण गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना.
आॅगस्ट २०१६ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात; मात्र पावसाअभावी काम रखडले
मार्च २०१७ मध्ये माळीण पुनर्वसनाचे काम पूर्ण

...अन् आठवणी ताज्या झाल्या
माळीण ग्रामस्थांना घरांचे हस्तांतर, स्मृतिस्तंभाचे व विविध कामांचे उद्घाटन दि. २ एप्रिल रोजी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. माळीणमध्ये ६७ घरे व १८ मूलभूत सोयीसुविधांनीयुक्त असे पुनर्वसन करण्यात आले आहे. यामध्ये झालेली कामे अतिशय गुणवत्तापूर्ण करण्याचे काम सर्वांनी मिळून केले आहे. माळीणमधील महिलांनी किचन ओट्याची मागणी केली होती, तीदेखील पूर्ण करण्यात आली आहे. तसेच, या सर्व कामांचे थर्ड पार्टी आॅडिटदेखील करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर उर्वरित छोटीमोठी कामे केली जातील.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी पुणे
४४४
माळीण दुर्घटना स्वत: डोळ्याने पाहिली. संपूर्ण गाव क्षणात डोंगराखाली गाडले गेले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ग्रामस्थांची स्मशानभूमीत थांबून ओळख पटवून देण्याचे काम करावे लागले. ते चित्र डोळ्यांसमोर येताच अंगात वारं शिरल्यासारखं वाटतं. ‘नशीब आमचं, आम्ही घरी नव्हतो, पाणी पाहून वापस घरी गेलो असतो तर आम्ही दिसलो नसतो.’ आज नवीन गाव पाहून आनंद होते. मात्र, जुना गाव तो जुना गाव होता, त्याची सर कशालाच येणार नाही... - कमाजी पोटे, ग्रामस्थ
४४४
कामानिमित्त घोडेगावला असल्यामुळे वाचलो; पण कुटुंबातील इतर लोक गेले, याचे दु:ख अजनूही आहे. आता जिल्हाधिकारी सौरभ राव व शासनाच्या सहकार्यामुळे आमच्या अपेक्षांपेक्षा चांगली व लवकर घरे मिळत असल्याचा आनंद आज होत आहे. त्यात ही संपूर्ण घरे सिमेंटची व अ‍ॅल्युफॉम या नवीन तंत्रज्ञानात बांधली गेली आहेत. त्यामुळे भविष्यात भूकंप जरी आला, तरी घरांना काही धोका नाही, अशी घरे बांधण्यात आल्याने आम्ही निर्धास्त झालो आहोत - विजय लेंभे, ग्रामस्थ
४४४
माळीण दुर्घटनेतून आम्ही नशिबानं बचावलो; मात्र नंतर आमचे खूप हाल झाले. वाचलेल्या घरांना भविष्यात धोका पोहोचू शकतो; म्हणून आम्हाला घरात राहू नका, असं सांगण्यात आलं. त्यामुळे दुसरा निवारा पाहावा लागला. बाधित कुटुंबांप्रमाणे आम्हाला मदत मिळाली नाही; त्यामुळे आमची परवड झाली. मात्र, आता नवीन घरं पाहून ३ वर्षे झालेला त्रास काहीच वाटत नाही, एवढं सुंदर आमचे गाव वसलं आहे.
- राजेंद्र झांजरे, ग्रामस्थ
४४४
माळीणच्या घरांची रचना करताना येथील लोकांचे राहणीमान, त्यांच्या गरजा, नैसर्गिक परिस्थिती या सगळया गोष्टींचा विचार केला आहे. घरांमध्ये नैसर्गिक प्रकाश यावा, यासाठी घरांची उंची, दरवाजे, खिडक्या त्याप्रमाणात दिल्या आहेत. गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सोयीचे गाव वसविले आहे.
- योगेश राठी, वास्तुविशारद
४४४
माळीणसारख्या दुर्घटना राज्यात कुठेही उद्भवू शकतात; मात्र अद्यापदेखील याबाबत शासनाने काही धोरण ठरवलेले नाही. माळीण दुर्घटनेतून बोध घेऊन शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत.
-देवदत्त निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
४४४
 

Web Title: Standing again Malin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.