स्थायी समितीसाठी दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच
By admin | Published: March 5, 2016 12:52 AM2016-03-05T00:52:43+5:302016-03-05T00:52:43+5:30
स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पुणे : स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. महापालिकेतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना साकडे घातले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही स्थायीचे अध्यक्षपद कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहावे, असा आग्रह पवार यांच्याकडे धरला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होणार, याचा फैसला अखेर शनिवारी सकाळी स्थायीच्या बैठकीत होणार असून त्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब बोडके, काँग्रेसकडून अविनाश बागवे, तर भाजपाकडून राजेंद्र शिळीमकर या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ६, काँग्रेस, मनसे व भाजपाचे प्रत्येकी ३, तर शिवसेनेचे २ असे बलाबल आहे.
राष्ट्रवादीला अध्यक्षपदी उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान एका पक्षाचा पाठिंबा मिळवावाच लागणार आहे. आघाडीमध्ये बिघाडी झाल्यास अध्यक्षपदासाठी मनसेची मदत घेण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठेवण्यात आली आहे. नाशिक महापालिकेमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मनसेलाही राष्ट्रवादीची मदत लागणार असल्याने त्याबदल्यात पुण्यात मदत करण्याच्या समीकरणावर विचार केला जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जो निरोप येईल, त्यानुसार मनसेकडून मतदान केले जाणार असल्याचे मनसेचे गटनेते बाबू वागस्कर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी कायम ठेवण्याचा आग्रह धरला आहे. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर अडून राहिल्यास मनसे किंवा शिवसेनेची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.