बोरिवली येथील पूल बांधण्याच्या खर्चात ३०० टक्क्यांनी वाढ; स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 10:24 PM2021-06-16T22:24:17+5:302021-06-16T22:26:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बोरीवली येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकाम खर्चात तब्बल तीनशे टक्क्यांची वाढ झाली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: बोरीवली येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकाम खर्चात तब्बल तीनशे टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कार्यादेश देताना १६१ कोटी रुपये मंजूर केलेला खर्च आता ६५१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या वाढीव खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मात्र स्थायी समितीने या बांधकामासाठी नव्याने निविदा काढून हे काम करुन घेण्याचे निर्देश देत वाढीव खर्चाचा प्रस्ताव बुधवारी फेटाळला.
बोरीवली, कोराकेंद्र येथे आर.एम.भट्टड व स्वामी विवेकानंद मार्ग या जंक्शनवरील कल्पना चावला चौकात नोव्हेंबर २०१८ पासून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, कालांतराने या पुलाच्या बांधकामात काही बदल करण्यात आले. परंतु, त्यासाठी निविदा न मागवता त्याच ठेकेदाराला पालिकेने काम देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा खर्च १६१ कोटी रुपयांवरुन ६५१ कोटींवर पोहोचला. या वाढीव खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे मांडण्यात आला होता.
सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी संबधित प्रस्ताव फेटाळण्याची उपसुचना मांडली. यास सर्वपक्षीय सदस्यांनी पाठींबा दिला. या कामासाठी नव्याने निविदा का काढल्या नाहीत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. तीनशे टक्क्यांचा वाढीव खर्च निविदा न मागता करण्यामागे प्रशासनाची भूमिका काय ? असा सवाल भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला.
प्रस्ताव रद्द...
या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नव्याने निविदा मागवून त्वरित कामाला सुरुवात करा, अशी सुचना भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी केली. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा असा वाया जाऊ देणार नाही. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
यामुळे वाढला खर्च..
भारतीय मानंक कोडमध्ये नव्या सुधारणा लागू झाल्यामुळे पुलाच्या सुरक्षेसाठी बेअरिंगमध्ये सुधारणा करण्यात आल्या. तसेच, पुलाची लांबी वाढविण्याचेही प्रस्तावित आहे. चर्चेच्यावेळी दरवाढीबाबत कोणतेही धोरण ठरविले नव्हते. आतापर्यंत ६० टक्क्यांपर्यंतच्या दरवाढीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्थायी समितीला सांगितले.
वाहतूक कोंडीची अडचण...
दोन वर्षे या प्रस्तावाचे कागदी घोडे नाचण्यात आले. या कामासाठी नव्याने निविदा मागवाव्या लागणार आहेत. त्यात किमान चार - पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.