"हे कोकणी लोक चु**..."; वादग्रस्त वक्तव्यानंतर मुन्नावर फारुकीने मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 11:03 PM2024-08-12T23:03:29+5:302024-08-13T00:23:15+5:30
कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरल्याच्या प्रकरणात स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकीने माफी मागितली आहे.
Munawar Faruqui : स्टँडअप कॉमेडियन मुन्नावर फारुकी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. स्टॅन्ड अप कॉमेडी कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. मुन्नावर फारुकीने स्टँडअप दरम्यान महाराष्ट्रातील कोकणात राहणाऱ्या लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरलेल्या भाषेवरून हा वाद निर्माण झाला आहे. मुन्नावरचा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरल्याने मनसे, शिवसेना आणि भाजप नेत्यांनी मुन्नावर फारुखीला इशारा दिला. त्यानंतर आता मुन्नावरने याबाबत माफी मागितली आहे.
मुन्नावर फारुकीच्या मुंबईतल्या एका स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये हा सगळा प्रकार घडला होता. मुन्नावरने प्रेक्षकांना तुम्ही सर्वजण मुंबईच्या वेगवेगळ्या भागातूनच आलेले आहात का? तुमच्यापैकी कोणी लांब राहतं का? कोणी लांबचा प्रवास करून इथे आलंय का? असा सवाल विचारला होता. त्यानंतर एकाने तळोजा, मुंबईबाहेरून आलोय, असं उत्तर दिलं होतं. त्यावर फारुकीने, “हे लोक आज सांगतायत की प्रवास करून आलोय, अन्यथा यांचे गाववाले लोक यांना विचारतात, कुठे राहता? तेव्हा हेच लोक त्यांच्या गाववाल्यांना सांगतात, मुंबईत राहतो. हे कोकणी लोक सगळ्यांना च** बनवतात,” असं म्हटलं होतं.
मु्न्नावरच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत मुन्नावरविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. तसेच भाजप आमदार नितेश राणे यांनीही ज्याने कोकणी माणसाची खिल्ली उडवली त्याच्या घराचा पत्ता आमच्याकडे आहे. त्याला लवकरच धडा शिकवू, असा इशारा दिला होता. त्यानंतर आता मुन्नावर फारुखीने या सगळ्या प्रकरणावर माफी मागितली आहे.
"काही दिवसांपूर्वी एक शो झाला होता तेव्हा तिथल्या प्रेक्षकांसोबत मी बोलत होतो. त्यावेळी कोकणाचा विषय निघाला. तळोजात अनेक कोकणी लोक राहतात हे मला माहिती होतं. कारण माझे अनेक मित्र आहेत. ती गोष्ट थोडी संदर्भाबाहेर गेली आहे. लोकांना वाटतंय की कोकणाची थट्टा केलीय. तर असं नाहीये मित्रांनो. माझा हेतू अजिबात तो नव्हता. प्रेक्षकांसोबत बोलताना माझ्या तोंडून त्यावेळी ते निघाले. मी पाहिलं की काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. स्टॅन्ड अप कॉमेडियन म्हणून कोणीही दुःखी होऊ नये असंच मला वाटतं. मी मनापासून माफी मागतो. जय हिंद जय महाराष्ट्र," असे मुन्नवरने म्हटलं आहे.
फटके खाण्य अगोधर सरळ झाला..
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 12, 2024
परत कोकण आणि हिंदुं बदल बोललास तर ..
direct action होईल !
जय कोकण
जय श्री राम 🚩 pic.twitter.com/Bnrqi03Sod
दरम्यान, मुन्नावरने कोकणी जनतेची माफी मागितली नाही, तर हा 'पाकिस्तानप्रेमी' मुन्नावर जिथे दिसेल तिथे पायदळी तुडवला जाईल, असा इशारा शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी दिला आहे. एवढेच नाही तर समाधानने मुन्नावरला मारहाण करणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस देऊ असेही सरवणकर यांनी सांगितले.