‘सैराट’ची तिकिटे न दिल्याने मारहाण
By admin | Published: May 11, 2016 12:48 AM2016-05-11T00:48:31+5:302016-05-11T00:48:31+5:30
दौंडमध्ये सैराट या चित्रपटाची तिकिटे न मिळाल्याने थिएटरमालकावर तलवारीने वार केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड : दौंडमध्ये सैराट या चित्रपटाची तिकिटे न मिळाल्याने थिएटरमालकावर तलवारीने वार केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवारी घेऊन आलेल्या टोळक्याने थिएटरमालकाच्या ६६ वर्षीय आईचे केस ओढून त्यांना रस्त्यावर धक्काबुक्की केली असल्याची माहिती दौंड पोलीसांनी दिली. ही घटना शनिवारी (दि.७) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास सहकार चौक परिसरातील गणेश मिनी थिएटर येथे हा प्रकार घडला.
रोहित रवींद्र कांबळे, विराज रवींद्र कांबळे व त्याचे इतर चार साथीदार सैराटचा शो सुरू असताना थिएटरमध्ये आले. थिएटरमालक श्रीनाथ कांबळे याने त्यांना शो सुरू झाल्याचे सांगत तिकिटे नसल्याचे सांगितले.
दरम्यान, संबंधितांना श्रीनाथ याने त्यांना शो सुरू असतानाची गर्दी दाखविली; परंतु सिनेमाबघायचा असे सांगत ते तिकिटावर अडून राहिले. तिकीट न दिल्याच्या रागापोटी त्यांनी तलवारी आणून थिएटरच्या पुढील भागाची तोडफोड केली. श्रीनाथ कांबळे यास रस्त्यावर उभ्या असलेल्या मारुती व्हॅगनार या गाडीत टाकून डोके, छाती, कंबर व पाठीवर बेदम मारहाण केली. कांबळे यांची आई कौसल्या कांबळे या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांना त्यांचे केस ओढून धक्काबुक्की करण्यात आली. सहा जणांनी जाताना तलवारी नाचवत थिएटरवर दगडफेक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. श्रीनाथ कांबळे याच्या डोक्यास व पायास गंभीर जखम झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कौसल्या नागनाथ कांबळे (रा. खाटीक गल्ली, दौंड) यांनी संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार सहा जणांविरुद्ध दंगल, मारहाण, नुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान विराज रवींद्र कांबळे याने थिएटरमालकाच्या विरोधात तक्रार दिली असून, थिएटरमालकाने थिएटरच्या आत सैराटचे शंभर रुपयांचे तिकीट पाचशे रुपयांना घ्यावे लागेल, असे सांगून थिएटरमालक श्रीनाथ कांबळे व त्याच्या इतर ३ साथीदारांनी आम्हाला मारहाण करून डाव्या हाताला फ्रॅक्चर केल्याची परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.