एसी मुंबई दर्शन बससेवेचा आरंभ
By Admin | Published: August 12, 2016 04:14 AM2016-08-12T04:14:34+5:302016-08-12T04:14:34+5:30
जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची आणि त्या पाहण्याची इच्छा असते. ‘मुंबई दर्शन’ या वातानुकूलित बसमुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनातील मुंबईच्या दर्शनाची
मुंबई : जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची आणि त्या पाहण्याची इच्छा असते. ‘मुंबई दर्शन’ या वातानुकूलित बसमुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनातील मुंबईच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) व बेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘मुंबई दर्शन सहल’ या वातानुकूलित बसचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, अभिनेत्री जुही चावला, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी यांच्यासह अर्जेटिना, श्रीलंका, बांगलादेश, इथिओपिया, मॉरिशस या देशांचे राजदूत, उद्योजक आदी उपस्थित होते.
पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुंबई दर्शन या वातानुकूलित बसचे दर कमी आहेत. सामान्य माणसालाही परवडतील असे हे दर आहेत. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत चांगल्याप्रकारे चालेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करून त्यांनी पर्यटनमंत्री व राज्यमंत्री यांचे अभिनंदन केले. पर्यटनामुळे विकास दरात वाढ होते तसेच पर्यटन हे राजदूताचे महत्त्वाचे कार्य करते. या बसमुळे मुंबईतील सर्व महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती जगभरात जाईल. पर्यटनातील गाइड हा महत्त्वाची भूमिका करत असतो. कारण त्याच्यामुळेच सर्व देश-विदेशी पर्यटकांना सर्व प्रेक्षणीय स्थळांची महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते, असेही ते म्हणाले. तर मुंबई दर्शन वातानुकूलित बस ही मुख्यमंत्र्यांच्या ‘व्हिजीट महाराष्ट्र-२०१७’ची नांदी असून त्यादृष्टीने पर्यटन विभागाने पहिले पाऊल टाकले आहे. जगासमोर मुंबईची ओळख दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात नागपूर, औरंगाबाद, पुणे येथेही अशा प्रकारे दर्शन बस सुरू करण्याचा मानस असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले. मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, राज्यमंत्री, आमदार, मुख्य सचिव, अधिकारी, उद्योजक, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार तसेच विद्यार्थी यांनी आज पहिल्या दिवशी ‘वातानुकूलित मुंबई दर्शन बस’मधून काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. (प्रतिनिधी)