प्रचाराची धुळवड सुरू
By Admin | Published: February 5, 2017 04:17 AM2017-02-05T04:17:18+5:302017-02-05T04:17:29+5:30
महापालिकेच्या जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपली असून, जिल्हा परिषदेसाठीची तारीख एक दिवसावर आली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची किती जिल्ह्यांमध्ये आघाडी झाली
- अतुल कुलकर्णी, मुंबई
महापालिकेच्या जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपली असून, जिल्हा परिषदेसाठीची तारीख एक दिवसावर आली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची किती जिल्ह्यांमध्ये आघाडी झाली, याची माहिती दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे नाही, तर शिवसेनेशी असलेली युती तुटल्याने भाजपाला बंडोबांनी घेरले आहे.
अशा स्थितीतच प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवातला असून, जणू आतापासूनच शिमगाच सुरू झाला आहे. सारेच पक्ष एकमेकांवर जोरात तुटून पडणार असल्याने, होळीपूर्वीच राज्यात धुळवड पाहायला मिळणार आहे. प्रचाराची राळ अशी उडेल की, सर्वांच्या अंगावरच डाग पडतील. राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांनी मुंबईत मानखुर्दमधून, तर शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांनी गिरगावातून आज प्रचाराला सुरुवात केली. गिरगावच्या सभेतही ठाकरे यांनी मुंबईवर भगवा फडकेल, त्यावर कोणत्याही पक्षाचा डाग नसेल, असा दावा केला.
भाजपाची प्रचाराची सगळी भिस्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी या मंत्र्यांनाही भाजपा प्रचारात उतरवणार आहे, तर पूनम महाजन यांच्यावर तरुणांना एकत्र करण्याची जबाबदारी आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आणि उस्मानाबादेतून प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसतर्फे अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे राज्यभर सभा घेतील. मात्र मुंबईत गुरुदास कामत, कृपाशंकर सिंह, नसीमखान, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त हे प्रचारापासून दूर राहणार असून, नारायण राणे व नसीम खान यांनी मुंबईत प्रचारच करणार नाही असे जाहीर केले आहे. राष्ट्रवादीतर्फे शरद पवार, अजित पवार राज्यात, जयंत पाटील आदी नेते प्रचार करतील. शिवसेनेने आपले मंत्री, आमदार तसेच संपर्कप्रमुखांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या असून, विदर्भ वगळता उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत.
सेना-राष्ट्रवादीच्या प्रचाराचे नारळ फुटले
मुंबई महापालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असतानाच शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मानखुर्द येथे झालेल्या सभेत विरोधकांवर तोफ डागत राजकीय फटकेबाजी केली.
तर गिरगाव येथे झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तोफ डागत ही अस्तित्त्वाची लढाई असल्याचे भाष्य केले. विशेषत: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच सभेत विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याचे भाष्य केले. - वृत्त/२
आरोपांची जुगलबंदी सुरू...
काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ रविवारी अशोक चव्हाण फोडणार आहेत. उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोपांची जुगलबंदी सुरूच झाली असून, काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे लक्ष्य नेमके हेच दोन पक्ष आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तर चारही पक्षांना टार्गेट लक्ष्य केले आहे.
गुपचूप
फॉर्मचे वाटप
प्रत्येक नेता आपण जिल्ह्याचे मालक आहोत, अशा थाटात वावरत असल्याने, आम्ही पक्षाचे नेते आहोत की कारकून आहोत? असा प्रश्न आम्हाला पडल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवले, तर भाजपाच्या विवेकानंद गुप्ता या पदाधिकाऱ्याने उमेदवारांची यादी परस्पर जाहीर केली. शेवटी भाजपाला मध्यरात्री २ वाजता यादी जाहीर करावी लागली. शिवसेनेलाही उमेदवारांना गुपचूप बोलावून एबी फॉर्म गुपचूप देण्याची वेळ आली.