‘नगर नियोजनासंबंधी अभ्यासक्रम सुरू करा’
By Admin | Published: July 5, 2016 01:59 AM2016-07-05T01:59:21+5:302016-07-05T01:59:21+5:30
सत्तेत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ५०० स्मार्ट सिटी उभारण्याची घोषणा केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग
मुंबई : सत्तेत येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ५०० स्मार्ट सिटी उभारण्याची घोषणा केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीनेही कंबर कसली आहे. नगर व्यवस्थापन आणि नगर नियोजनासंदर्भात नवे अभ्यासक्रम तातडीने तयार करावेत, अशा सूचना यूजीसीने सर्व विद्यापीठांना नुकत्याच पाठविलेल्या पत्रातून दिल्या आहेत.
उत्तम नागरी सुविधांनी परिपूर्ण असलेली अद्ययावत नगरे वसविणे किंवा सध्याच्या महानगरांना नवे रूपडे देण्यासाठी स्मार्ट सिटी योजना आखण्यात आली. देशभर राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी येत्या काळात तज्ज्ञ नगर रचनाकारांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासणार आहे. हे मनुष्यबळ तयार करण्याची जबाबदारी केंद्र शासनाने उच्च शिक्षण क्षेत्रावर सोपविली आहे.
नगर नियोजनासंबंधी विशेष अभ्यासक्रम तयार करा किंवा सध्याच्या अभ्यासक्रमांमध्ये यासंदर्भातील एखादा विषय समाविष्ट करा, असे यूजीसीने देशभरातील विद्यापीठांना सूचित केले आहे. तसेच संबंधित विद्यापीठांशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांकडूनही याच सूचनांची अंमलबजावणी करून घ्यावी, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी तातडीने पावले उचलण्यासही यूजीसीने बजावले आहे. आता कोणते विद्यापीठ कशा प्रकारचे आणि दर्जाचे नवीन अभ्यासक्रम तयार करते, याकडे विद्यार्थी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)