'त्या' खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना; भाजपचे दोन-चार नेते तुरुंगात जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 06:29 AM2022-03-24T06:29:03+5:302022-03-24T06:30:21+5:30
सरकारकडे भाजपच्या बऱ्याच नेत्यांची बरीच प्रकरणे आहेत; पण त्यावर कारवाई करीत नसल्याने त्यांना सरकारची भीती नाही, अशी भावना जवळपास अर्धा डझन मंत्र्यांनी बोलून दाखवली.
- यदु जोशी
मुंबई : राज्यातील भाजपच्या दोन-चार नेत्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आपल्याविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाया थांबणार नाहीत. ते बदल्याच्या भावनेने वागत असताना आपण का शांत बसायचे, असा संताप मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी व्यक्त केला. फडणवीस सरकारच्या काळातील भाजपच्या खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा अन् पुढची पावले उचला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना सांगितल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली.
बैठकीत नियमित विषयांवर चर्चेनंतर अधिकाऱ्यांना जाण्यास सांगितले. नंतर सध्याच्या राजकारणावर वादळी चर्चा झाली. महाविकास आघाडीचे नेते, मंत्री भ्रष्ट असल्याचे चित्र भाजपकडून रंगविले जात आहे. सरकारकडे भाजपच्या बऱ्याच नेत्यांची बरीच प्रकरणे आहेत; पण त्यावर कारवाई करीत नसल्याने त्यांना सरकारची भीती नाही, अशी भावना जवळपास अर्धा डझन मंत्र्यांनी बोलून दाखवली. प्रवीण दरेकर, नितेश राणे यांच्यावर कारवाई होतच आहे; पण गेल्या सरकारच्या काळात किमान ६ ते ७ खात्यांमध्ये मोठे घोटाळे झाले, ती माहिती समोर आणली पाहिजे, माहितीवर न थांबता कारवाई केली पाहिजे असाही मंत्र्यांनी आग्रह धरला.
ठाकरे झाले आक्रमक
सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय आक्रमक होते. जवळपास वीस मिनिटे ते बोलले.
आपले मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला नाही. मात्र, कधी नव्हे इतके खालच्या पातळीवरचे राजकारण भाजपकडून खेळले जात असल्याचे ते म्हणाले.
आज होत असलेल्या कारवायांना अजिबात घाबरण्याचे कारण नाही. यांच्या दबावाखाली येण्याचे काहीही कारण नाही. तुम्ही मला त्यांच्यावर कारवाई करायला सांगत आहात.
मी तर आहेच; पण तुम्ही आपापल्या खात्यातील आधीच्या पाच वर्षांतील प्रकरणांच्या फायली तयार करा. शेवटी माझी मदत घ्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिल्याचे समजते.
तुम्हाला प्रकरणे दिली, त्याचे काहीतरी करा; जयंत पाटील यांची बाळासाहेब थोरात यांना विनंती
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महसूलमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात घेतले गेलेले काही निर्णय चौकशी आणि कारवाईच्या रडारवर येऊ शकतात.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना असे म्हणाल्याचे समजते की, मी तुमच्याकडे चंद्रकांत पाटलांच्या काळातील दोन प्रकरणे दिलेली होती. त्यावर लवकर कारवाई केली तर बरे होईल. लगेच लक्ष घालतो असे थोरात यांनी यावर सांगितल्याचे समजते.
मला अधिकार द्या, मी नागपुरात त्यांना सरळ करतो
सुनील केदार बैठकीत आक्रमक झाले. ‘नागपुरात आमदार कृष्णा खोपडे, मुन्ना यादव यांची बरीच प्रकरणे आहेत. मला अधिकार द्या, त्यांना बरोबर सरळ करतो’, असे केदार म्हणाल्याचे समजते. पोलिसांत तक्रारी केल्या; पण कारवाई होत नाही, या शब्दांत केदार यांनी नागपूर पोलीस आयुक्तांबाबत नाराजी व्यक्त केली.
हे आधीच आहेत रडारवर
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या महत्त्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेची चौकशी आधीच सुरू आहे.
सुधीर मुनगंटीवार हे त्यावेळी वनमंत्रीदेखील होते. त्यांच्या महत्त्वाकांक्षी अशा ३३ कोटी वृक्षलागवडीची चौकशी आधीच सुरू आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा खाते हाेते. त्यातील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले आहेत.
गिरीश महाजन तत्कालीन जलसंपदामंत्री हे बीएचआर घोटाळ्यात कारवाईच्या कचाट्यात असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह बॉम्ब टाकून बाजी पलटविली.