प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास ध्वजारोहणाने प्रारंभ

By admin | Published: February 12, 2016 01:01 AM2016-02-12T01:01:51+5:302016-02-12T01:01:51+5:30

बागलाण तालुक्यातील प्रसिध्द दिगंबर जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान वृषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना व महामस्तकाभिषेक

Start with the flag hoisting ceremony of Pranpritishtha | प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास ध्वजारोहणाने प्रारंभ

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास ध्वजारोहणाने प्रारंभ

Next

नाशिक : बागलाण तालुक्यातील प्रसिध्द दिगंबर जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर अखंड पाषाणात कोरण्यात आलेल्या भगवान वृषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना व महामस्तकाभिषेक सोहळ्याला ध्वजारोहणाने अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. चेन्नई येथील सारिका जैन यांच्या हस्ते सर्वतोभद्र महलासमोर ध्वजारोहण केल्यानंतर णमोकार मंत्रघोषात सोहळा सुरु झाला.
या पंचकल्याणक महोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या सुमारे एक लाख चौरस फुटाच्या सर्वतोभद्र महलचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ही १०८ फूट उंचीची भगवान वृषभदेव यांची मूर्ती देशाचा ऐतिहासिक ठेवा ठरेल तसेच या मूर्तीमुळे मांगीतुंगी तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर विकसीत होईल, असे बागडे यांनी यावेळी सांगितले. या वेळी ज्ञानमती माता, चंदनामती माता, आचार्य अनेकांतसागरजी महाराज, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दीपिका चव्हाण, जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते, मूर्तीनिर्माण समितीचे डॉ. पन्नालाल पापडीवाल, हस्तिनापूरचे पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी इ. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मांगीतुंगी पर्वतावरील मांगीगिरी शिखरावर गेल्या चौदा वर्षांपूर्वी अखंड पाषाण शोधण्याचे काम सुरु होते . शास्त्रज्ञ, भूतज्ज्ञ यांच्या मदतीने तब्बल दहा वर्षांनी अखंड पाषाण शोधण्यात यश येऊन भगवान वृषभदेवाची १०८ फुटी मूर्ती पाषाणात कोरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चार वर्षानंतर ही मूर्ती साकार झाली. जगातील सर्वाधिक उंच ठरलेल्या या मूर्तीमुळे या परिसराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. महोत्सवांतर्गत पहिल्या दिवशी सुमारे पाच हजार दाम्पत्यांनी दिवसभर सर्वतोभद्र महलमध्ये विधिवत पूजा केली. यावेळी ज्ञानमती माताजी, चंदनामती माताजी व अन्य आचार्य, मुनी, माताजींनी मिरवणूकीद्वारे भगवान वृषभदेवाची लघुमूर्ती आणून तिची विधीवत स्थापना केली. (प्रतिनिधी)

Web Title: Start with the flag hoisting ceremony of Pranpritishtha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.