ध्वजारोहणाने आज कुंभपर्वाला प्रारंभ
By Admin | Published: August 19, 2015 01:05 AM2015-08-19T01:05:55+5:302015-08-19T01:05:55+5:30
सिंहस्थ कुंभमेळ्याची द्वाही देणारे साधूंच्या आखाड्यांचे ध्वजारोहण बुधवारी सकाळी वेदमंत्रांच्या उद्घोषात येथील साधुग्राममध्ये होणार आहे
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याची द्वाही देणारे साधूंच्या आखाड्यांचे ध्वजारोहण बुधवारी सकाळी वेदमंत्रांच्या उद्घोषात येथील साधुग्राममध्ये होणार आहे. या सोहळ्यानंतर नाशिक -औरंगाबाद रोडवर नव्याने उभारण्यात आलेल्या साधुग्रामच्या जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कुंभमेळ्याचे शाहीस्नान जवळ आल्याची द्वाही ध्वजारोहणाद्वारे दिली जात असल्याने या सोहळ्याला कुंभपर्वात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाशिकमध्ये वैष्णवपंथीय साधूंचे दिगंबर अनी, निर्वाणी अनी व निर्मोही अनी असे तीन प्रमुख आखाडे असून, या सर्वांचे स्वतंत्रपणे ध्वजारोहण बुधवारी सकाळी ८.१० च्या मुहूर्तावर तपोवनातील साधुग्राममध्ये होईल.
असे आहेत ध्वज...
दिगंबर अनी आखाड्याचा ध्वज पंचरंगी असून, त्यांत पांढरा, काळा, लाल, हिरवा व पिवळा या रंगांचा समावेश आहे. निर्वाणी अनी आखाड्याचा ध्वज लाल, तर निर्मोही अनी आखाड्याचा ध्वज पांढऱ्या रंगाचा आहे. तिन्ही आखाड्यांच्या ध्वजावर हनुमानाची छबी आहे. ५१ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर पुढील महिनाभर हे ध्वज फडकत राहणार आहेत.