अंबाबरवा गाव खाली करण्यास प्रारंभ
By admin | Published: May 5, 2016 03:03 AM2016-05-05T03:03:39+5:302016-05-05T03:24:52+5:30
वाघ वाचविण्याच्या मोहीमेतील पहिले पाऊल; गाव व शेतांच्या जागी होणार गवती कुरण.
बुलडाणा: महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगतच्या बुलडाणा व अकोला जिल्ह्यामध्ये पसरलेल्या अंबाबरवा अभयारण्यातील अंबाबरवा हे गाव पंधरा दिवसात उठणार असून, त्याची सुरूवात मंगळवारी संध्याकाळी झाली. या गावातील २९८ ग्रामस्थांना वन विभागाच्या वतिने पुनवर्सन मोबदल्याचे वाटप मंगळवारी करण्यात आले असून, अनेक कुटूंबांनी बुधवारपासून गाव सोडण्यास सुरूवातही केली आहे. हे गाव पूर्ण खाली झाले, की येथे वन्यप्राण्यांचा राबता व्हावा, यासाठी कुरण तयार केले जाणार असल्याची माहिती वन्यजिव विभागाने दिली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडोर असलेल्या या अभयारण्यातील अंबाबरवा या गावाच्या पूनर्वसनास प्राधान्य देण्यात आले असून, पुढील टप्यात रोहीणखेड हे गाव उठविले जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी वन्यजिव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा, जिल्हा परिषद सदस्य डॉ.वासुदेवराव गावंडे, संग्रामपुर पंचायत समितीचे सभापती पांडूरंग हागे, भाजपाचे तालुका अध्यक्ष दशरथ सुरडकर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रश्नांचे अभ्यासक यादव तरटे यांच्या उपस्थितीत पुनवर्सनाच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, येथील सामाजिक कार्यकर्त्या उषा भालेराव या केंद्रीय पर्यावरण समितीच्या सदस्या असताना, त्यांनी अंबाबरवा अभयारण्याचा प्रश्न केंद्र स्तरावर नेला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्याकडे अंबाबरवा अभयारण्य घोषित करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. सध्या होत असलेले अंबाबरवा गावाचे पुनवर्सन योग्य असून, यामुळे वाघ वाचविण्याच्या मोहीमेत मोठे यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला .
सव्वा कोटीचे रोख वितरण
अंबाबरवा गावातील २९८ ग्रामस्थ पुनवर्सनाच्या यादीत असून, त्यापैकी १४५ ग्रामस्थांना प्रत्येकी ८0 हजार याप्रमाणे रोख रकमेचे वाटप मंगळवारी करण्यात आले. ही रक्कम देताना पती-पत्नीची स्वाक्षरी घेण्यात आली आहे. पुनर्वसनाची उर्वरित रक्कम ही प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये टाकली जाणार असून, त्यासाठी मंगळवारीच २९८ ग्रामस्थांचे बँक खाते अंबाबरवा या गावात जाऊनच उघडण्यात आले.
आदीवासींची पसंती मध्यप्रदेशला
अंबाबरवा या गावात राठीया, भिलाला, पावरा, बारेला, भील्ल, कोरकू, न्याहाल या जमातीमध्ये मोडणारे आदीवासीं वास्तव्याला आहेत. त्यापैकी काहींनी सहा महिन्याअगोदरच मध्यप्रदेशामध्ये आसरा घेतला आहे. त्यापाठोपाठ येथील आदिवासी बांधव मध्यप्रदेशात जात आहेत. विशेष म्हणजे या आदीवासींना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाराष्ट्रात मोठी अडचण होती, ती मध्यप्रदेशात राहणार नाही. त्यामुळे पुनवर्सन प्रमाणपत्रासोबतच अंबाबरवाचे आदीवासी आता मध्यप्रदेशचे रहिवासी होणार आहेत.