वैद्यकीय व अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 09:45 PM2018-06-06T21:45:38+5:302018-06-06T21:45:38+5:30
नीट व एमएचटी-सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्याने राज्य चाचणी कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास सुरूवात झाली आहे.
पुणे : वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षाकडून प्रसिध्द करण्यात आले. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना गुरूवार (दि.७) पासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. वैद्यकीयसाठी दि. १७ तर अभियांत्रिकीसाठी दि. १९ जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
नीट व एमएचटी-सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्याने राज्य चाचणी कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास सुरूवात झाली आहे. प्रामुख्याने वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष असते. त्यानुसार दोन्ही अभ्यासक्रमांची प्रक्रिया गुरूवारपासून सुरू करण्याचा निर्णय कक्षाने घेतला असून आॅनलाईन अर्ज नोंदणीसाठी संकेतस्थळाच्या लिंक सुरू होतील. वैद्यकीयसाठी आॅनलाईन नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. ७ ते १७ जून या कालावधीत सुरू असेल. दि. १८ जूनपर्यंत स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर दि. १९ जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. अंतिम गुणवत्ता यादीनंतर पसंती क्रम अर्ज भरणे, पहिल्या फेरीची निवड यादी प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश अशी प्रक्रिया असेल. कक्षाकडून पहिल्या फेरीपर्यंतचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दि. १ आॅगस्टपासून महाविद्यालये सुरू होतील.
अभियांत्रिकी प्रवेशाचे तीन फेऱ्यांपर्यंतचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. आॅनलाईन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती दि. ७ ते १९ जून या कालावधीत होईल. पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी दि. २१ जूनला तर अंतिम गुणवत्ता यादी २४ जूनला जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना पसंती क्रम भरून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरू होईल. तीन फेऱ्यांपर्यंतची प्रक्रिया दि. २० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. अॅडमिशन रिपोर्टिंग सेंटर तसेच आवश्यक माहिती सीईटी कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
--------------------
वैद्यकीय प्रवेशची कागदपत्रे पडताळणीसाठी केंद्र -
१. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भायखळा, मुंबई
२. आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय, वरळी, मुंबई
३. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे
४. शासकीय वैद्यकीय महाविद्याय, नागपुर
५. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपुर
६. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद
७. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नांदेड
८. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, उस्मानाबादवैद्यकीय प्रवेशासाठी संकेतस्थळ -
...........................
2.वैद्यकीय प्रवेशाचे वेळापत्रक
आॅनलाईन नोंदणी व अर्ज भरणे - दि. ७ ते १७ जून
नोंदणी शुल्क भरण्याची अंतिम मुदत - दि. १८ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी - दि. १९ जून (सायंकाळी ५ वाजेनंतर)
कागदपत्रांची पडताळणी - दि. २१ ते २५ जून
सुधारित तात्पुरती गुणवत्ता यादी - दि. २६ जून
आॅनलाईन पसंती क्रम अर्ज भरणे - दि. २६ ते २९ जून
पहिल्या फेरीची निवड यादी प्रसिध्द करणे - दि. २ जुलै
पहिल्या फेरीनुसार महाविद्यालयात प्रवेश घेणे - दि. १२ जुलैपर्यंत
-----------------------
वैद्यकीय प्रवेसासाठी अर्ज भरताना त्यामध्ये केवळ ‘नीट आॅल इंडिया रँक’ नमुद करावा लागेल. बँकेमध्ये चलन भरल्याशिवाय आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच कागदपत्रांच्या पडताळणीवेळी ही सर्व कागदपत्रे संबंधित केंद्रावर दाखवाली लागतील.
-----------
अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक -
आॅनलाईन अर्ज नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती - दि. ७ ते १९ जून
तात्पुरती गुणवत्ता यादी - दि. २१ जून
यादीवर हरकती - दि. २२ व २३ जून
अंतिम गुणवत्ता यादी व पहिल्या फेरीसाठी जागांची स्थिती - दि. २४ जून
आॅनलाईन पसंती क्रम - दि. २५ ते २८ जून
कॅप १ ची निवड यादी - दि. २९ जून
एआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चिती - दि. ३० जून ते ४ जुलै
दुसºया फेरीसाठी रिक्त जागा - दि. ५ जूलै
आॅनलाईन पसंती क्रम - दि. ६ ते ८ जुलै
कॅप २ निवड यादी - दि. ९ जुलै
एआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चिती - दि. १० ते १२ जुलै
कॅप ३ साठी रिक्त जागा - दि. १३ जुलै
आॅनलाईन पसंती क्रम - दि. १४ ते १६ जुलै
कॅप ३ निवड यादी - दि. १७ जुलै
एआरसी केंद्रांवर प्रवेश निश्चिती - दि. १८ ते २० जुलै