पुढील तीन दिवस पाऊस, परतीच्या महिन्याचा प्रारंभ मुसळधारेने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 05:52 AM2019-09-04T05:52:10+5:302019-09-04T05:52:28+5:30

पुढील तीन दिवस पाऊस राज्यभर सक्रिय; कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर अधिक राहणार

The start of the return month begins with a rainstorm | पुढील तीन दिवस पाऊस, परतीच्या महिन्याचा प्रारंभ मुसळधारेने

पुढील तीन दिवस पाऊस, परतीच्या महिन्याचा प्रारंभ मुसळधारेने

Next

मुंबई : मान्सूनच्या परतीचा महिना म्हणून ओळख असलेल्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या २४ तासांपासून मुंबई, ठाणे, नवी आणि रायगडमध्ये मान्सूनने तुफान फटकेबाजी केली आहे. विशेषत: मुंबईत तुफान पाऊस कोसळला असून, येथे १३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुढील २ ते ३ दिवस मान्सून राज्यभर सक्रिय राहील. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर मान्सूनचा जोर राहील. मराठवाड्यातही सरी कोसळतील. गुरुवारनंतर मात्र मान्सूनचा जोर कमी होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरावर व त्या लगतच्या ओडिशाच्या किनारपट्टीवर सलग सातवे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरासह लगतची ओडिशाची किनारपट्टी आणि पश्चिम बंगालवर ते स्थित आहे. परिणामी, मध्य आणि पूर्वेकडील भागात मान्सून सक्रिय झाला आहे.

दरम्यान, मंगळवारी मुंबईत चांगला पाऊस झाला. विदर्भाच्या काही भागांत मध्यम सरी बरसल्या. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत हवामान कोरडे होते. पुढील २४ ते ४८ तासांत मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि मालेगाव या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. पुण्यात हलका पाऊस राहील. मराठवाड्यातील काही भागांत एक ते दोन मध्यम सरींची शक्यता आहे. त्यानंतर, पावसाची तीव्रता कमी होईल, परंतु विदर्भ, कोकण आणि गोवा येथे अधून मधून पाऊस पडतच राहील.

रत्नागिरी, महाबळेश्वरमध्ये मध्यम ते मुसळधार
गेल्या २४ तासांत कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस झाला असून, पुढील २४ तासांतही कोकण आणि गोव्यातील काही भागांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. २४ तासांत रत्नागिरी, मुंबई, डहाणू, हर्णे, महाबळेश्वर या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सखल भागांत साचले पाणी
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसाच्या तुफान फटकेबाजीमुळे हिंदमाता, सायन येथील प्रतीक्षानगर, अ‍ॅन्टॉप हिल, माटुंगा येथील गांधी मार्केट, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज, चेंबूर येथील शेल कॉलनी, चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, चेंबूर येथील टेंबी ब्रीज, देवनार कॉलनी, टिळकनगर, मिलन सबवे येथील सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते.
हवाईसेवा विस्कळीत
मुंबई व परिसरात मंगळवारी कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा व कमी दृश्यमानतेचा फटका हवाई वाहतुकीला बसला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या व या विमानतळावर उतरणाºया विमानांना काही काळ विलंब झाला.
लोकल सेवेला फटका
पूर्व आणि पश्चिम उपनगरात मंगळवारी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने याचा फटका लोकल सेवेला बसला. मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल फेºया १० ते १५ मिनिटे तर पश्चिम मार्गावरील लोकल फेºया ५ ते १० मिनिटे उशिराने धावत होत्या. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. त्यामुळे इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी २० ते ३० मिनिटांचा उशीर झाल्याची नाराजी मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी व्यक्त केली.
रायगडमध्ये १,१३४ मि.मी. पाऊस
अलिबाग : गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तब्बल एक हजार १३४ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ऐन गणेशोत्सवात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सार्वजनिक गणेश मंडळांना बसला आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजन पडल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहाययला मिळाले.

ठाण्यात सर्वाधिक
सोमवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रत्नागिरीमध्ये १३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, अलिबाग १३३ मिमी, सांताक्रुझ १३१ मिमी, हर्णेमध्ये ९४ मिमी आणि कुलाबामध्ये ८० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

नवी मुंबईतही जोरदार
नवी मुंबई : नवी मुंबईत मंगळवारी संपूर्ण दिवसभरात सरासरी २७.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक पावसाची नोंद नेरुळमध्ये झाली. पावसामुळे जागोजागी पाणी सचले. सुदैवाने झाडे पडल्याची अथवा इतर दुर्घटना घडलेली नाही. मंगळवारी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सरासरी २७.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. यात नेरुळ विभागात ४२.५० मि.मी., बेलापूर ३७ मि.मी., वाशी २०.५० मि.मी, तर ऐरोलीत १० मि.मी. पावसाची नोंद झाली.

भिवंडीत पुराच्या पाण्यात वृद्ध वाहून गेला
ठाणे : जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने पाऊस मंगळवारी दिवसभर जोरदार हजेरी लावली. या पावसादरम्यान दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील पाये येथील नाईकपाड्यामधील वृद्ध शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली. दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी बाहेर पडलेल्या भक्तांचीही यामुळे त्रेधातिपिट उडाली.
भिवंडीच्या नाईकपाडा येथील ६२ वर्षीय लक्ष्मण लाडक्या सफीस हा शेतकरी दुपारी शेतातून घरी येत असताना शेताच्या बांधापासून वाहत जाणाºया नाला ओलांडत असताना तोल जावून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे येथील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. याशिवाय दुपारच्या वेळी पोखरण रोड, डॉ. आंबेडकर चौक येथे लावलेल्या होर्डिंग्जला शॉक लागत असल्याची तक्रार आली. तर गायमुख जवळ घोडबंदर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याशिवाय मनोरुग्णालयाजवळी मोठा वृक्ष उन्मळून पडला तर पाचपाखाडी येथील एक झाड धोकादायक स्थितीत आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३८८.४०मिमी पाऊस पडला. सरासरी ५५.४९ मिमी या पावसाची नोंद करण्यात आली. ठाणे तालुक्यात सर्वाधिक १४१ मिमी. तर कल्याणला ४३.४०, मुरबाडला ४ मिमी, उल्हासनगरला ८३, अंबरनाथला ५२, भिवंडीला ५५ आणि शहापूर तालुक्यात १० मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The start of the return month begins with a rainstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.