नारळाची होळी पेटवून सैलानी यात्रेला प्रारंभ
By Admin | Published: March 24, 2016 02:07 AM2016-03-24T02:07:38+5:302016-03-24T02:07:38+5:30
लाखो भाविकांची उपस्थिती; जादूटोणा विरोधी कायद्याचे सर्रास उल्लंघन.
विठ्ठल सोनुने / पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा)
सर्व धर्मियांचे ङ्म्रध्दास्थान असलेल्या सैलानी दर्गा परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजता कपड्याची व नारळाची होळी करून लाखो भाविकांच्या उपस्थितीत सैलानी बाबाच्या यात्रेस सुरूवात झाली. जादूटोण्यासाठी वापरण्यात येणार्या सुया, बिबे, काळ्या बाहुल्या यावेळी परिसरात दिसून आल्या. येथे जादूटोणा विरोधी कायद्याचे सर्रास उल्लघन होताना दिसून आले.
सैलानी बाबा दर्गाचे मुजावर शेख रफिक मुजावर, हाजी शेख हाशम मुजावर, शे.नजीर मुजावर, शेख चाँद मुजावर, जिल्हा पोलिस अधिक्षक संजयकुमार बाविस्कर, अप्पर पोलिस अधिक्षक श्वेता खेडकर यांच्या हस्ते होळीची पुजा करुन, नैवेद्य दाखवून पेटविण्यात आली. होळीचे भाविकांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता यावे, यासाठी होळीभोवती पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. या यात्रेसाठी राज्य तसेच राज्याबाहेरील भाविक मोठय़ा प्रमाणात दाखल झाल्यामुळे होळीत टाकण्यासाठी नारळाची प्रचंड विक्री झाली. अनेक भाविकांनी सुकलेल्या नारळाला बिबे, गोटे, निंबू, खिळे ठोकून ते नारळ दहा रुपयात विकले. तर उपस्थितांनी आपल्या सोबत असलेल्या मनोरुग्णांच्या अंगावरुन गोटे, बिबे, टोचलेले नारळ व मनोरुग्णाच्या अंगावरील जुने कपडे या होळीत टाकले. त्यामुळे परिसरात प्रचंड धूर झाला होता. या धूरामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदुषण होत असून होळीत कपड्याऐवजी फक्त नारळ टाकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अनेकांनी केली.