राज्यातील व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:21 PM2021-06-10T23:21:38+5:302021-06-10T23:23:26+5:30

काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) ने सर्व व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन बंद ठेवण्याच्या सूचना केल्या असताना महाराष्ट्र वनविभागाने एक पाऊल पुढे टाकत वनपर्यटन सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

Start tourism of the tiger project in the state | राज्यातील व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन सुरू करा

राज्यातील व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन सुरू करा

Next
ठळक मुद्देपीसीसीएफ (वन्यजीव) यांचा एनटीसीएला प्रस्ताव निर्बंधमुक्त केलेल्या जिल्ह्यांमध्ये ५ व्याघ्र प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) ने सर्व व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन बंद ठेवण्याच्या सूचना केल्या असताना महाराष्ट्र वनविभागाने एक पाऊल पुढे टाकत वनपर्यटन सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. व्याघ्र प्रकल्प असलेल्या जिल्ह्यात काेराेनाची स्थिती सुधारत असल्याने पुढाकार घेतला जात आहे. वनविभागाने व्याघ्र पर्यटन सुरू करण्याची मागणी एनटीसीएकडे केली असून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकाेडकर यांनी याबाबतचा प्रस्ताव एनटीसीएचे अतिरिक्त महासंचालक व सदस्य सचिवांना सादर केल्याची माहिती समाेर आली आहे.

मागील वर्षीपासून सुरू झालेल्या काेराेना महामारीमुळे वन्यजीव पर्यटनावर माेठा परिणाम झाला आहे. त्यामुळे वनविभागाने पर्यटन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याने यावर अवलंबून असलेले व्यावसायिक, गाइड यांच्यात आनंद पसरला आहे. पीसीसीएफ काकाेडकर यांनी ९ जून राेजी एनटीसीएकडे वन्यजीव पर्यटन सुरू करण्याची मागणी करणारे पत्र दिल्याचे सांगण्यात येत आहे. ‘व्याघ्र प्रकल्पामध्ये सॅनिटायझेशन, मास्कचा वापर आणि काेराेना नियंत्रण नियमांचे पालन करून पर्यटन करणे शक्य आहे. वन्यजीव सफारी करताना प्राण्यांना हाताळण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे मानवाकडून प्राण्यांमध्ये काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पर्यटनाला परवानगी देण्यास हरकत नाही’, असा विश्वास पीसीसीएफ यांनी पत्रात नमूद केला आहे.

राज्य शासनाच्या ४ जूनच्या निर्देशानुसार ‘ब्रेकिंग द चेन’अंतर्गत नियमावली केली आहे. शासनाने पाॅझिटिव्हिटी दर, रुग्णांची टक्केवारी व ऑक्सिजन बेड उपलब्धतेच्या आधारावर जिल्ह्यांची विभागणी केली आहे. त्यानुसार, विदर्भातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प या नियमावलीतून सुटतात. व्याघ्र प्रकल्प असलेले जिल्हे लेव्हल-१ ते लेव्हल-३ च्या कॅटेगरीत आहेत. या कॅटेगरीमध्ये असलेल्या जिल्ह्यात सर्व दुकाने, रेस्टाॅरंट, चित्रपटगृह, माॅल्स आदी नियमांचे पालन करून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्य वन्यजीव अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार व्याघ्र प्रकल्पांचे पर्यटन बंद असल्याने जिप्सीचालक, गाइड्स, हाॅटेल व्यवसायाशी जुळलेल्या कामगारांचा राेजगारावर माेठा परिणाम झाला आहे. त्यामुळे तातडीने पर्यटन सुरू करण्याची गरज असल्याचे काकाेडकर यांनी स्पष्ट केले.

लाेकमतशी बाेलताना नितीन काकाेडकर म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ अंतर्गत स्थानिक प्रशासनाच्या नियंत्रणात पर्यटनाला चालना दिली जाऊ शकते. त्यामुळे वनविभागाने एनटीसीएला राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या पर्यटनाबाबत दिलेल्या निर्देशांवर पुन्हा विचार करून पर्यटन सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. यानंतर ३० जूनपर्यंतच जंगलाच्या काेर एरियात पर्यटन केले जाऊ शकेल आणि पावसाळ्यामुळे २ जुलैपासून पुन्हा ते बंद करावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेता लवकर पर्यटनाला परवानगी देण्याची व नवीन परिपत्रक काढण्याची विनंती केली असल्याचे काकाेडकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Start tourism of the tiger project in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.