क्षयरोग निर्मूलन जागृती मोहिमेस आरंभ
By admin | Published: October 28, 2016 04:19 AM2016-10-28T04:19:48+5:302016-10-28T04:19:48+5:30
६७ व्या क्षयरोग निर्मूलन जनजागृती मोहिमेचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत गुरुवारी राजभवन येथे पार पडले. क्षयरोगाची राज्यातील सद्यस्थिती, तसेच
मुंबई : ६७ व्या क्षयरोग निर्मूलन जनजागृती मोहिमेचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत गुरुवारी राजभवन येथे पार पडले. क्षयरोगाची राज्यातील सद्यस्थिती, तसेच त्यावरील उपाययोजना याबद्दल राज्यपालांनी या वेळी माहिती घेतली.
भारतात क्षयरोगाचे प्रमाण जगात सर्वाधिक अधिक असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१५ सालच्या आकडेवारीनुसार, जगात ९६ लाख टीबी रुग्ण असून, त्यातील २२ लाख भारतात आहेत. औषधोपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या (ड्रग रेझिस्टन्ट ) क्षयरोगाचे प्रमाणदेखील भारतात जास्त असून, मुंबई शहरात झोपडपट्ट्यांमध्ये लोकसंख्येची घनता अधिक असल्यामुळे मल्टीड्रग रेझिस्टन्ट टीबीचे प्रमाण जास्त असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अँटी ट्युबरक्युलोसीस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश अंबे यांनी राज्यपालांना दिली. क्षयरोग निर्मूलन जनजागृती अभियानामुळे जनतेमध्ये क्षयरोगाबद्दल, तसेच त्यावरील उपचाराबद्दल जनजागृती निर्माण होत असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.
क्षयरोग व त्यावरील उपाय योजना याबाबत समाजात जनजागृती व्हावी, या हेतूने महाराष्ट्र राज्य अँटी ट्युबरक्युलोसीस असोसिएशनच्या वतीने दरवर्षी ही मोहीम राबविली जाते. कार्यक्रमाला डॉ. यतीन ढोलकिया, रेडक्रॉसच्या सचिव होमाई मोदी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)