आदिवासी आश्रमशाळेतील रिक्त पदे भरण्यास सुरुवात
By Admin | Published: April 7, 2017 02:47 AM2017-04-07T02:47:50+5:302017-04-07T02:47:50+5:30
आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर स्वयंसेवी संस्था आणि विरोधी पक्षांनी सरकारच्या भूमिकेबद्दल जोरदार आक्षेप घेतला होता
कर्जत/नेरळ : रायगड जिल्ह्यातील डोलवली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर स्वयंसेवी संस्था आणि विरोधी पक्षांनी सरकारच्या भूमिकेबद्दल जोरदार आक्षेप घेतला होता. त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षात आपली चूक सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलली असून, आदिवासी विकास विभागाच्या नाशिक आयुक्त कार्यालय हद्दीतील आदिवासी आश्रमशाळेतील महत्त्वाची सर्व रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. अधीक्षक, गृहपाल दर्जाची २५० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.
खालापूर तालुक्यातील डोलवली शासकीय आश्रमशाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या यमुना वासुदेव खडके या मुलीचा मृत्यू १३ जानेवारी २०१७ रोजी झाला होता. त्यावेळी तेथील महिला अधीक्षक आणि गृहपालसारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याचे समोर आले होते. त्याआधीपासून दिशा केंद्र या स्वयंसेवी संस्थेने राज्याचे राज्यपाल हे कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, आदिवासी आश्रमशाळांचा मुद्दा पुढे केला होता. त्या आदिवासी विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर आश्रमशाळेत सर्व विरोधी पक्षांनी भेट देत शासनाच्या भूमिकेबद्दल ताशेरे ओढले होते. हे प्रकरण घडल्यानंतर स्थानिक आमदार सुरेश लाड यांच्यासोबत दिशा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी विकासमंत्र्यांची भेट घेऊन तत्काळ आश्रमशाळांतील रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. त्यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी सर्व पदे भरण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले होते. रायगड जिल्ह्यात पेण प्रकल्पांतर्गत आदिवासी विकास विभाग २३ शासकीय आदिवासी आश्रमशाळा चालवीत आहे. त्या सर्व आश्रमशाळा या ठाणे येथील विभागीय उपायुक्त कार्यालयामार्फत आणि नाशिक येथील आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत चालविल्या जातात. त्यामुळे २०१४ पासून मोठ्या प्रमाणात आदिवासी आश्रमशाळेतील महिला, तसेच पुरु ष अधीक्षक, पुरु ष-महिला गृहपाल यांची रिक्त पदे आहेत. ही संख्या संपूर्ण विभागात मंजूर पदांमध्ये २५०च्या आसपास आहे. त्यामुळे रिक्त पदांचा प्रश्न समोर आला की, आदिवासी प्रकल्प कार्यालय रिक्त पदांचा चार्ट समोर ठेवून जनतेच्या, स्वयंसेवी संस्थांच्या आणि विरोधी पक्षांच्या तावडीतून आपली सुटका करून घेत असतात.
आदिवासी विकास विभाग अनेक ठिकाणी मुलींच्या आश्रमशाळा चालवीत आहे, तेथेदेखील महिला अधीक्षक यांची पदे रिक्त आहेत. या सर्वांवर आता तोडगा निघण्याची शक्यता असून, नाशिक येथील आयुक्त कार्यालयाच्या उपआयुक्त विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील आदिवासी आश्रमशाळांतील महिला अधीक्षक यांची ११३, पुरु ष अधीक्षक यांची २२, तसेच पुरु ष गृहपाल यांची १०, महिला गृहपाल यांची ५ अशी महत्त्वाची १५० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्याचवेळी ठाणे उपआयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील आदिवासी आश्रमशाळांतील महिला अधीक्षक यांची ६०, पुरु ष अधीक्षक यांची ३०, तसेच पुरु ष गृहपाल यांची सात, आणि महिला गृहपाल यांची पाच, अशी दोन्ही मिळून अधिकारी वर्गाची तब्बल २५० रिक्त पदे भरली जाणार आहेत. दोन्ही कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याने पाठपुरावा करणाऱ्या दिशा केंद्र या स्वयंसेवी संस्थेने समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)
ठाणे उपआयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रिक्त १३९ पैकी बहुतेक सर्व पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने नवीन शैक्षणिक वर्षात आदिवासी आश्रमशाळांना आवश्यक आणि पुरेसा कर्मचारी वर्ग मिळेल, असा विश्वास कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी व्यक्त केला आहे.
रायगड, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील आदिवासी आश्रमशाळेतील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
- मिलिंद गवांदे,
उपआयुक्त, ठाणे विभाग
रिक्त अधीक्षक, अधीक्षिका व गृहपाल पदे भरण्यासाठी दिशा केंद्राच्या वतीने मंत्री विष्णू सवरा यांची भेट घेऊन आश्रमशाळेतील रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. याची दखल घेत प्रशासनाने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या असून, दिशा केंद्राच्या मागणीला यश आले आहे.
- अशोक जंगले,
कार्यकारी संचालक,
दिशा केंद्र