नवीन पुलाचे काम लवकर सुरु करा
By Admin | Published: October 3, 2016 03:42 AM2016-10-03T03:42:55+5:302016-10-03T03:42:55+5:30
नवीन वाहतुक पुलाचे काम लवकर सुरु करा, अशी मागणी स्थानिक नगरसेविका दक्षता ठाकूर यांनी भारतीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) निवेदनाद्वारे केली
भाईंदर : वरसावे येथील ४३ वर्षे जुना पुल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक ठरल्याने नियोजित नवीन वाहतुक पुलाचे काम लवकर सुरु करा, अशी मागणी स्थानिक नगरसेविका दक्षता ठाकूर यांनी भारतीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी समाजसेवक राजेंद्र ठाकूर, एनएचएआयचे प्रभारी व्यवस्थापक दिनेश अग्रवाल उपस्थित होते.
सध्या असलेला ४३ वर्षे जुना पुल सततच्या दुरुस्तीकरीता वाहतुकीसाठी बंद ठेवत असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्यातच हा पुल उल्हासनदीवर असल्याने पुलाच्या एका बाजुकडील चाकरमान्यांना नोकरीसाठी तर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुलाचाच पर्याय आहे. त्यातच दुरुस्तीसाठी पुल बंद झाल्यास पुलावरुन ये-जा करणे धोकादायक ठरत आहे. नवीन पुलावरील अवजड वाहतुकीमुळे पुलाला हादरे बसत असल्याने चालणाऱ्यांना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागते. सध्या पुलाची तिसऱ्यांदा दुरुस्ती होत असून महिनाभरापासुन या पुलांच्या दुतर्फा प्रचंड वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजुंकडील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाला पर्याय म्हणुन एनएचएआयने केंद्र सरकारच्या मंजुरीनुसार नवीन पुलाची प्रक्रीया सुरु केली आहे. अलिकडेच त्याची निविदा प्रक्रीयादेखील पुर्ण करण्यात आल्याचे एनएचएआयच्या सुत्रांकडुन सांगण्यात आले आहे. यावरुन नवीन पुलाच्या निर्मितीचे सोपस्कार पार पडल्याने सततची वाहतुक कोंडी व अस्तित्वातील पुलाच्या दुरुस्तीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी त्याच्या कामाला लवकर सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)