उद्यापासून अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात
By admin | Published: August 7, 2016 09:14 PM2016-08-07T21:14:42+5:302016-08-07T21:14:42+5:30
अकरावी प्रवेशानंतरही महाविद्यालय किंवा शाखा बदल करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने विशेष आॅनलाईन फेरीचे आयोजन केले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7- अकरावीला दूरचे महाविद्यालय मिळाले आहे किंवा शाखा बदल करायचा आहे; अशा विविध कारणांमुळे अकरावी प्रवेशानंतरही महाविद्यालय किंवा शाखा बदल करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने विशेष आॅनलाईन फेरीचे आयोजन केले आहे. त्यासाठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करून आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सोमवारी, ८ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे.
याआधी मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीच्या २ लाख ६९ हजार ७७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत चार गुणवत्ता यादी जाहीर झाल्या. त्यातून एकूण १ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश घेतला. या यादीमध्ये नाव आल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही, अशा ७० हजार नॉट रिपोर्टेड
विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालयाने मेसेजद्वारे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांपैकी केवळ ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला होता.
या सर्व प्रक्रियेत अर्ज न भरल्याने किंवा अर्धवट अर्ज भरल्याने प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात शुक्रवार आणि शनिवारी सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे उपसंचालक कार्यालयाने सांगितले.
म्हणजेच आत्तापर्यंत सुमारे १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतला आहे. याउलट रिक्त जागांची संख्या एक लाखाच्या घरात गेली आहे. परिणामी घरापासून दूरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या, चुकीच्या शाखेत प्रवेश घेतलेल्या, चुकीचा विषय निवडलेल्या आणि अद्याप प्रवेशापासून वंचित असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना या रिक्त जागांवर प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
...................
४० मार्गदर्शन केंद्रांचा आधार
विशेष फेरीसाठी सोमवार व मंगळवारी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी उपसंचालक कार्यालयाने ४० मार्गदर्शन केंद्र पुन्हा एकदा सुरू केली आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याला (अकरावीला प्रवेश घेतलेल्या किंवा आत्तापर्यंत प्रवेश न घेतलेल्या) प्रवेश अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरता येईल. पसंतीक्रम अर्ज भरताना किमान १० किंवा कमाल १५ महाविद्यालयांची निवड बंधनकारक आहे. अर्ज करताना याआधी अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्याची गरज नाही. विशेष फेरीत आवडते महाविद्यालय मिळाल्यानंतरच आधीचा प्रवेश रद्द करण्याची खबरदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणतीही अडचण असल्यास मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे.