आजपासून हत्ती पकड मोहीम
By admin | Published: February 9, 2015 12:58 AM2015-02-09T00:58:32+5:302015-02-09T01:14:01+5:30
प्रतीक्षा संपली : प्रशिक्षित हत्ती दाखल; वनकर्मचाऱ्यांसह पोलीस पथक सज्ज
सावंतवाडी / माणगाव : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली हत्ती पकड मोहीम अखेर आज, सोमवारपासून प्रत्यक्षात माणगाव खोऱ्यात सुरू होणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ५० पोलिसांचे पथक सज्ज झाले आहे, अशी माहिती उपवनसंंरक्षक एस. रमेशकुमार यांनी पत्रकारांना दिली. ते सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालयात बोलत होते. यावेळी सहायक उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी, वनक्षेत्रपाल संजय पाटील, आदी उपस्थित होते.दहा वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुडगूस सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी साडेदहा कोटींचे शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, तर चारजणांचा हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेत माणगाव खोऱ्यात असलेल्या तीन हत्तींना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कर्नाटक सरकारकडून चार हत्तींना कर्नाटकातून सिंधुदुर्गमध्ये पाठविण्यात आले. हे हत्ती रविवारी मध्यरात्री आंबेरीत दाखल झाले. या हत्तींमध्ये अर्जुना, अभिमन्यू, हर्षा, गजेंद्रचा समावेश असून चार माहूत, कटर व अन्य असे मिळून २४ सदस्य या हत्ती मोहिमेत असणार आहेत, तर सिंधुदुर्ग वनविभागचे ७५ कर्मचारी तसेच ५० पोलिसांचे पथकही सहभागी होणार आहे. या मोहिमेचे नेतृत्व उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार व डॉ. उमाशंकर हे करणार असून, सिंधुदुर्ग वनविभागाला या मोहिमेसाठी ६९ लाखांची गरज आहे. त्यातील ६३ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, यात केंद्र सरकारने ३३ लाख, राज्य सरकारने १५ लाख व जिल्हा नियोजनमधून १५ लाख रुपये प्राप्त झाले असल्याचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी सांगितले. ही हत्ती मोहीम पंधरा दिवस चालणार आहे. माणगाव परिसरात सध्या तीन रानटी हत्ती असून, या सर्व हत्तींना कर्नाटकातून आलेले चार हत्ती प्रशिक्षित करणार आहेत. रानटी हत्तींना प्रशिक्षित केल्यानंतर त्यांचा सर्व खर्च शासन करणार असल्याचे रमेशकुमार यांनी सांगितले.
प्रशिक्षित हत्तींना जंगली हत्तींकडून सलामी
कर्नाटकातून चार प्रशिक्षित हत्ती रविवारी मध्यरात्री उशिरा आंबेरी वननाक्यात आल्यानंतर या हत्तींना रानटी हत्तींनी मोठी आरोळी फोडत सलामी दिली. यामुळे हत्तींसोबत आलेले कर्मचारी अवाक् बनले. प्रशिक्षित हत्ती आले तेव्हा रानटी हत्ती आंबेरी परिसरातच तळ ठोकून होते. त्यांनी मनोहर साटम व गजानन धुरी या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे.