मार्क वाढवणाऱ्या टोळीचा लागला छडा
By admin | Published: July 14, 2015 03:17 AM2015-07-14T03:17:55+5:302015-07-14T03:17:55+5:30
मार्क वाढवून देणारी, नापासांना पास करणारी टोळी मुंबई विद्यापीठात सक्रिय असून, लवकरच या टोळीचा छडा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
मुंबई : मार्क वाढवून देणारी, नापासांना पास करणारी टोळी मुंबई विद्यापीठात सक्रिय असून, लवकरच या टोळीचा छडा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लावला आहे. एसीबीने विद्यापीठाचे पर्यवेक्षक, परीक्षा पेपर तयार करणारे मॉडरेटर आणि अन्य कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठ परिसरात पानाची टपरी चालविणाऱ्या अरुण सालियन याला एसीबीने मे महिन्यात अटक केली होती. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये टीवायबीएच्या विद्यार्थिनीने दिलेल्या मानसशास्त्रच्या पेपरचे मार्क वाढविण्यास १० हजार रुपये स्वीकारताना एसीबीने अरुणला रंगेहाथ पकडले. त्याच्या टपरीतून १८ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, लिव्हिंग सर्टिफिकेट व हॉल तिकिटे आढळली. या १८ विद्यार्थ्यांची माहिती एसीबीने विद्यापीठाकडून मागवली आहे. सालियनच्या चौकशीतून विद्यापीठात काम करणारा एक शिपाई व एका खासगी व्यक्तीचे नाव समोर आले आहे. एसीबीने या दोघांची कसून चौकशी सुरू केली आहे. ही खासगी व्यक्ती पास होण्याची खात्री नसलेल्यांचा शोध घेत. विद्यार्थ्यांसह पालकांना मुलाला पास करून देण्याचे आमिष दाखवत. (प्रतिनिधी)