एप्रिलपासून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू
By admin | Published: March 15, 2016 01:44 AM2016-03-15T01:44:06+5:302016-03-15T01:44:06+5:30
गारपीट, वादळ, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तीच्या काळातही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी येत्या १ एप्रिलपासून केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी पंतप्रधान पीक विमा योजना
मुंबई : गारपीट, वादळ, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तीच्या काळातही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी येत्या १ एप्रिलपासून केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली.
राष्ट्रवादीचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात याबाबतचा प्रश्न विचारला होता. येत्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू होईल, त्यासाठी लवकरच राज्य मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव मांडला जाईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांना कमी हप्त्यात जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळणार असून, राज्य सरकारवर २ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. फळपीक विमा योजनेसाठी शेतकरी पुढे येत नाहीत. मोठे हप्ते भरणे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने सर्वंकष पीक विमा योजनेची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार, केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना जाहीर करून वर्ष उलटले आहे. मात्र, राज्य सरकार ही योजना राबविण्यात टाळाटाळ करीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नरेंद्र पाटील आदी सदस्यांनी केला.