रात्रीच्या वेळी पोस्टमार्टम सुरू करणार
By admin | Published: July 28, 2016 04:31 AM2016-07-28T04:31:01+5:302016-07-28T04:31:01+5:30
सरकारी रुग्णालयात रात्रीच्यावेळी पोस्टमार्टम सुरू करण्याबाबत येत्या १५ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच राज्यातील वैद्यकीय सेवेतील रिक्त पदे भरण्याकरिता जिल्हा
मुंबई : सरकारी रुग्णालयात रात्रीच्यावेळी पोस्टमार्टम सुरू करण्याबाबत येत्या १५ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच राज्यातील वैद्यकीय सेवेतील रिक्त पदे भरण्याकरिता जिल्हा रुग्णालयाशी जोडून वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात येतील, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी विधानसभेत केली.
सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी नियम २९३ अन्वये आरोग्य व जलसंधारण खात्याबाबत चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्या चर्चेला उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले की, सरकारी रुग्णालयांमधील रिक्त पदे हाच चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. राज्यातील वेगवेगळ््या ५३७ रुग्णालयांमध्ये ३२ हजार ८०० खाटा असून १४ वेगवेगळ््या वैद्यकीय सेवा या रुग्णालयांमधून पुरवल्या जातात. सध्या सरकारी १७ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. मात्र त्यामधून बाहेर पडणारे डॉक्टर व डॉक्टरांची गरज याचे प्रमाण व्यस्त आहे. राज्यात २६ खासगी वैद्यकीय महाविद्यालये असून त्यामधून शिक्षण घेणाऱ्यांची सरकारी रुग्णालयात सेवा बजावण्याची इच्छा नाही. त्यामुळे डोंगरी व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची वेगळी गुणवत्ता यादी तयार करून १० टक्के जागा त्याच भागात वैद्यकीय सेवा पुरवण्याकरिता राखून ठेवण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय मंत्र्यांकडेही हीच भूमिका मांडल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा रुग्णालयाशी जोडून वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले तर डॉक्टरांची कमतरता कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रात्रीच्यावेळी पोस्टमार्टम न करण्याची कायद्यातील तरतूद ही ब्रिटीशकालीन असून ती बदलण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्याचा संदर्भ देत डॉ. सावंत यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)