कर्जत-कल्याण मार्गावर खड्डे भरण्यास सुरुवात
By admin | Published: January 19, 2017 03:28 AM2017-01-19T03:28:22+5:302017-01-19T03:28:22+5:30
कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत.
नेरळ : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांत पाच अपघात घडले आहेत. या संदर्भात डिकसळ ग्रामस्थांनी अनेक वेळा बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणूनही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते. या संदर्भात ‘लोकमत’ ने १७ जानेवारी रोजी ‘कर्जत-कल्याण राज्यमार्गावर अपघातात वाढ’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत बांधकाम विभागाने या रस्त्यावर डांबराने खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे.
कर्जत तालुक्यातील कर्जत -कल्याण राज्यमार्गावरील डिकसळजवळील एका हॉटेलजवळ असलेला गतिरोधक आणि खोल खड्डा यामुळे येथे पाच अपघात घडले आहेत. गेल्या दोन महिन्यांत येथे दोन चारचाकी आणि दोन दुचाकीला अपघात घडला असून अनेक जण जखमी झाले. असे असताना अनेक वेळा बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांनी तक्रार केली. परंतु या जागेची पाहणी देखील करण्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळाला नव्हता. या रस्त्यावर चार महिन्यांत अनेकवेळा खड्डे भरले परंतु काही दिवसातच या रस्त्यांची अवस्था पुन्हा खड्डेमय होते. त्यामुळे या रस्त्यावर प्रवासी व वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वी याच ररस्त्यावरील कर्जत रेल्वे पुलावर दोन दुचाकीमध्ये अपघात घडला असून एक तरु ण मृत पावला आहे. असे अनेक अपघात घडत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र बेफिकीर असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपघातानंतर अशा अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी ते करत आहेत.
तसेच याच कर्जत - कल्याण मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पाहायला मिळत आहेत. याच रस्त्यावर नेरळ जिते गावाजवळ पावसाळ्यात दरड कोसळल्याने दगडे रस्त्याच्या कडेला आले आहेत, त्यांचीही पाहणी करून ते लवकर उचलण्यात यावेत व त्या भागात डांबराने खड्डे भरावे, अशी मागणी देखील वाहनचालकांकडून होत आहे.
>कर्जत-कल्याण राज्य मार्गावर पाच अपघात घडल्यानंतर बांधकाम विभागाला जाग आली आहे. त्यानंतर या मार्गावर बांधकाम विभागाने डांबराने खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. परंतु हे खड्डे चांगल्या दर्जाचे भरावेत. जर हे खड्डे लगेचच उखडले तर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येईल.
- किशोर गायकवाड,
स्थानिक ग्रामस्थ, डिकसळ