आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू
By admin | Published: June 13, 2016 11:08 PM2016-06-13T23:08:15+5:302016-06-13T23:14:27+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयात आजपासून (मंगळवार) अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण सर्वांना प्रवेश मिळणार असून,
अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयात आजपासून (मंगळवार) अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण सर्वांना प्रवेश मिळणार असून, यंदाही प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका मोफत देण्याचे आदेश आहेत.
अकरावी प्रवेशाबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवारी प्राचार्यांची बैठक बोलावली होती. त्यात अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ‘माध्यमिक’चे शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य बैठकीला उपस्थित होते.
प्रवेश अर्ज स्वीकृती, गुणवत्ता यादी प्रसिद्धी, त्यावर आक्षेप, प्रतीक्षा यादी, त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात येणार आहेत. अनुदानित तुकड्यांचे सर्व प्रवेश झाल्यानंतरच विनाअनुदानितचे प्रवेश सुरू होतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शासन निर्णयाप्रमाणे प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका यांचे कोणतेही शुल्क महाविद्यालयांनी आकारू नये, कोणत्याही परिस्थितीत जादा प्रवेश देण्यात येऊ नयेत, असे आढळल्यास संबंधित महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सक्त सूचनाही माध्यमिक विभागाने दिल्या आहेत. १३ जुलैपर्यंत सर्व प्रवेश प्रकिया पूर्ण करून १४ जुलैपासून अकरावीच्या सर्व शाखांचे वर्ग सुरू होतील.
(प्रतिनिधी)