आजपासून अकरावीची तिसरी विशेष फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2016 05:13 AM2016-08-27T05:13:26+5:302016-08-27T05:13:26+5:30
शनिवारपासून सुरुवात होत असून शुक्रवारी संपलेल्या दुसऱ्या विशेष फेरीत एकूण १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलला आहे.
मुंबई : अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीला शनिवारपासून सुरुवात होत असून शुक्रवारी संपलेल्या दुसऱ्या विशेष फेरीत एकूण १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलला आहे. दरम्यान, तिसऱ्या विशेष फेरीसाठी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावे लागणार
आहेत.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या विशेष फेरीमध्ये एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी दिली होती. त्यातील १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत महाविद्यालय बदलाचा निर्णय घेतला. उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या विशेष फेरीचे आयोजन शनिवारपासून केलेले आहे. २७, २९ आणि ३० आॅगस्ट रोजी इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांवर नव्याने लॉगइन आयडी आणि पासवर्ड घेता येईल. तर २९ आणि ३० आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येईल. तिसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाईल.
तिसऱ्या विशेष फेरीतही विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालयांना पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे. गुणवत्ता यादीत नाव जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात १ ते २ सप्टेंबरदरम्यान प्रवेश निश्चित करायचा आहे. तरी अर्जात पसंतीक्रम दर्शवणाऱ्या संबंधित महाविद्यालयांतील रिक्त जागांची संख्या पाहूनच विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)