आजपासून अकरावीची विशेष प्रवेश फेरी, ठरावीक विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 04:25 AM2017-09-04T04:25:17+5:302017-09-04T04:25:57+5:30
दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर झाला.
मुंबई : दहावी आणि बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून लगेचच पुरवणी परीक्षा घेण्यात येते. दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर झाला. या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळावा म्हणून अकरावी आॅनलाइन प्रवेशाची दुसरी विशेष फेरी राबवण्यात येत आहे. ४ ते ७ सप्टेंबर कालावधीत ही फेरी राबविण्यात येणार आहे.
दुस-या विशेष प्रवेश फेरीत ठरावीक विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येणार आहे. आतापर्यंत प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेच्या निकालानुसार उत्तीर्ण अथवा एटीकेटी मिळालेले विद्यार्थी, प्रवेश नाकारलेले, महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेले, प्रवेश अर्जाच्या भाग १ चे अॅप्रूव्हल न घेतल्याने प्रवेश प्रक्रियेबाहेर पडलेले, अजूनपर्यंत एकदाही आॅनलाइन अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सामावून घेण्यात येणार आहे.
पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला अर्ज भरून अॅप्रूव्ह करून घेतला आहे, त्यांनी फक्त दुसरा अर्ज भरावयाचा आहे. मार्गदर्शन केंद्रावर जाऊन विद्यार्थी अर्ज भरू शकतात. या विद्यार्थ्यांनी अर्जात गुण भरताना गुणपत्रिकेवरील मार्च-जुलै या दोन्ही परीक्षांची गुणांची बेरीज अर्जात भरावयाची आहे.